मुंबई - कॅप्टन अमोल यादव व राज्य सरकारमध्ये 35 हजार कोटी रूपयांचा करार झाला आहे. या करारामुळे कॅप्टन अमोल यादव यांचं स्वदेशी विमान झेपावण्याचा मार्ग मोकळा झाला असून आता त्यांच्या विमान कारखान्यासाठी राज्य सरकारने जागाही दिली आहे. पालघरमध्ये एमआयडीसीमार्फत विमान कारखान्यासाठी जागा देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला. त्यामुळे अखेर अमोल यादव यांची प्रतीक्षा संपली आहे. आता राज्य सरकारने लवकरात लवकर या कराराची अंमलबजावणी करुन जागेचा ताबा द्यावा. कारखाना उभा करुन त्यामध्ये पहिलं विमान तयार होण्याची प्रतीक्षा आहे, असं प्रतिक्रिया अमोल यादव यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.
अमोल यादव यांचा महाराष्ट्रात सुरू होणारा कारखाना भारतातील पहिलाच स्वदेशी विमान तयार करणारा कारखाना असेल. 20 नोव्हेंबर रोजी डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन विभागाने अमोल यादव यांच्या विमानाचं रजिस्ट्रेशन करुन घेतलं होतं. त्यांना मुख्यमंत्र्यांकडून याबाबतचं पत्र देण्यात आलं होतं.
अमोल यादव यांनी तयार केलेल्या भारतीय बनावटीच्या विमानाच्या प्रकल्पासाठी लागणारी १५७ एकर जमीन देण्यासाठी या विमानाला नागरी विमान वाहतूक महासंचालकांचे (डीजीसीए) प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असल्याने ते मिळविण्यासाठी स्वत: प्रयत्न करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. तसंच त्यानंतर केळवे येथील जमिनीबाबत त्या विमान कंपनीने ‘एमआयडीसी’सोबत आवश्यक तो करार करावा, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.
मूळचे साताऱ्याचे रहिवासी असणाऱ्या अमोल यांनी तब्बल १७ वर्षांच्या मेहनतीनंतर भारतीय बनावटीचे विमान बनवले आहे. मुंबईत राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवरच त्यांचे हे प्रयोग सुरू होते. मुंबईतील ‘मेक इन इंडिया’च्या प्रदर्शनानंतर त्यांचा हा यशस्वी प्रयोग पहिल्यांदा जगासमोर आला. त्यानंतर अनेक देशांनी, राज्यांनी, कंपन्यांनी त्यांच्यासमोर विमाने बनविण्याचे प्रस्ताव ठेवले. पण आपल्या महाराष्ट्रातच कंपनी उभारायचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने जागा देण्याचे आश्वासन दिले होते. कॅ. यादव यांनी अमेरिकेत वैमानिक होण्यासाठी प्रशिक्षण घेतलं आहे.