मुंबई : आईने घेतलेले कर्ज, त्यामुळे कर्जदारांची घराबाहेर वाढती रांग यातून सुटण्यासाठी अंधेरीच्या समीरने आईसह आजीची हत्या करत स्वत:ला संपविल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याचा आई आणि आजीवर जीव होता. आपल्यानंतर त्यांचे काय होणार, या काळजीत त्याने हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांना आहे. अंधेरी पश्चिमेतील इंदिरानगर परिसरातील संक्रमण शिबिरात समीर बारसकर उर्फ समीर खान, आई मीनाताई बारसकर उर्फ मीनाताई खान आणि आजी फातिमा शेख (७५) यांच्यासोबत राहायचा. समीर हा मीनाताई यांचा सावत्र मुलगा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, तो त्यांचाच मुलगा असल्याचे तपासात समोर आले. फातिमा ही मीनाताई यांची मानलेली आई आहे. समीरचा दोघींवरही जीव होता. मीनातार्इंनी बरेच कर्ज काढले होते. समीरचा धाबा होता. धाब्यावर जमलेल्या गल्ल्यातील पैशांतून तो घरखर्च आणि कर्जदारांचे पैसे फेडत होता. मात्र कर्ज फिटत नव्हते. त्यामुळे नेहमी दारावर येणाऱ्या कर्जदारांमुळे समीर वैतागून गेला होता. रोजच्या कटकटीला कंटाळून त्याने जीव देण्याचा निर्णय घेतला. आपल्यानंतर आई आणि आजीचे काय होणार, या काळजीने त्याने त्यांनाही संपविण्याचे ठरवले. मंगळवारच्या रात्री आई आणि आजीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यांच्या अंगावर चादर पांघरून स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याचा मृत्यू गळफास घेतल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. मात्र, आई, आजीच्या शवविच्छेदनाचा अहवाल मिळणे बाकी आहे. (प्रतिनिधी)
कर्जदारांपासून सुटण्यासाठी आई, आजीची केली हत्या
By admin | Updated: April 28, 2017 03:44 IST