मुंबई : राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडत असला तरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर विभागातील धरणांमधील जलसाठ्यांत अजूनही समाधानकारक वाढ झालेली नाही. त्यातही मराठवाड्यातील धरणांची परिस्थिती चिंताजनक आहे. तेथील सर्व धरणांमधील साठा केवळ तीन टक्के एवढाच आहे. त्यामुळे वर्षभराची तहान भागण्यासाठी मराठवाड्याला अजून मुसळधार पावसाची गरज आहे. मराठवाड्यात चिंताजनक स्थितीजुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील कोरड्या प्रकल्पांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. शून्यावर आलेला विभागातील सरासरी उपयुक्त जलसाठा आठवडाभरातच दोन टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. सर्वात मोठे जायकवाडी धरण अद्यापही मृतसाठ्यातच आहे. मराठवाड्यात सध्या ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी एक टक्का जलसाठा आहे. विभागातील मध्यम तसेच लघू प्रकल्पांमधील साठा सरासरी ३ टक्के आहे. विष्णूपुरी, निम्न दुधना आणि पेनगंगा प्रकल्पांचा अपवाद विभागातील आठही मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या शून्य टक्के उपयुक्त साठा आहे. दहा दिवसांपूर्वी विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा ३ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. तो आता २५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. निम्न दुधना प्रकल्पात सध्या ९ टक्के आणि पेनगंगा प्रकल्पात तीन टक्के उपयुक्त जलसाठा आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)पुणे जिल्ह्यातील २५ धरणांची एकूण क्षमता २१५ टीएमसी इतकी आहे. आज सकाळी आठपर्यंत धरणांमध्ये ६१.४५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत १२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पुणे आणि सोलापूरला शेतीसाठी वरदान असलेल्या भाटघर धरणातही पाणीसाठा वाढला आहे. भाटघरमध्ये ९.२६, नीरा देवघर ४.७३ आणि वीर धरणात ४.२७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याच्या डोंगराळ भागात सुरू असलेल्या पावसाने नद्यांना पूर आले आहेत. त्यामुळे उजनी धरणातही मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. उजनीमध्ये २४.९८ टीएमसी पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा उणे असला तरी खडकवासला धरणातून ६ हजार क्युसेक्सने सोडण्यात येत असलेले पाणी तसेच कुकडी, मुळा, पवना, इंद्रायणी, भीमा नद्यांतून धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. पुणे जिल्ह्यांत सर्वदूर होत असलेल्या मुसळधार पावसाने भीमा खोऱ्यातील २५ धरणांमध्ये २८.५४ टक्के पाणीसाठा झाला आहे. मंगळवारी दिवसभरही पावसाचा जोर कायम असल्याने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येत आहे. विदर्भातील धरणे३७ टक्के भरलीगेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नागपूर विभागातील धरणेआतापर्यंत ३७ टक्के भरली आहेत. मागील वर्षांपेक्षा ही वाढ सात टक्के जास्त आहे. नागपूर जिल्ह्यातील मोठ्या धरणांपैकी तोतलाडोह ३२ टक्के भरले आहे. गोसेखुर्द ६७, चारगाव ६६, चंद्रभागा ५९, वेणा ५८ टक्के भरले आहे. अमरावती विभागातील मोठ्या नऊसह एकूण ४६० सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून २४ टक्के साठा झाला आहे. मोठ्या नऊ प्रकल्पातील साठा ३२ टक्क्यांवर आहे.गोदा खोऱ्यातील साठ्यात समाधानकारक वाढ नाशिक विभागातील गोदेच्या खोऱ्यातील प्रकल्पांमध्ये वेगाने पाणीसाठा होत आहे. सर्व प्रकल्पांमध्ये मिळून एकूण २५ टक्के साठा आहे. नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणातील जलसाठा ५९ टक्क्यांवर पोहचला आहे. भंडारदरा व मुळा धरणातील पाण्याची आवक सुरूच असून मुळा धरणात ११ तर भंडारदरात ५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयनेत ४०.५३ टीएमसी पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरू असल्याने कृष्णा खोऱ्यातील धरणांमध्य वेगाने साठा वाढत आहे. महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणात तब्बल ७५ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू असून ४०.५३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चोवीस तासांत तब्बल ५ टीएमसीने वाढ झाली आहे. चांदोली धरणाची पाणी साठवण क्षमता ३४.४० टीएमसी आहे. धरणक्षेत्रात संततधार सुरू असल्याने गेल्या २४ तासात पाणीसाठ्यात चार टीएमसीने वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा ५१८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच १८.३० टीएमसी, तर धरण पातळी ६०८.०० मीटर झाली आहे. पाणीसाठ्याची टक्केवारी ५३.२० आहे.राज्यात सर्वात जास्त साठा कोकण विभागात झाला आहे. येथील मोठ्या ५ प्रकल्प ५६ टक्के भरले आहेत. तर सर्व १६० प्रकल्पांमध्ये एकूण ५८ टक्के पाणीसाठा झाला आहे.
धरणे भरण्यास हवा आणखी पाऊस
By admin | Updated: July 13, 2016 04:14 IST