मुंबई : भाजपाने अल्पमतातील सरकार स्थापन केल्यास भाजपा मुंबईतील आणखी काही चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. त्यात मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांचा समावेश आहे. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत लोकसभा आणि आता विधानसभेत भाजपाने घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे मंत्रिपदाचे ते प्रबळ दावेदार आहेत. शेलार यांच्यापाठोपाठ पाचव्यांदा निवडून आलेले राज पुरोहित यांच्या नावाचीही मंत्रिपदासाठी चर्चा आहे. महिला चेहराही मंत्रिमंडळात दिसू शकतो. त्यात दहिसरमधून निवडून आलेल्या मनीषा चौधरी आणि गोरेगावमधून निवडून आलेल्या विद्या ठाकूर यांचाही समावेश होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. चौधरी या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष असून डहाणूच्या नगराध्यक्षपदाची धुराही त्यांनी सांभाळलेली आहे. चार वेळा नगरसेविका आणि उपमहापौरपद भूषवलेल्या विद्या ठाकूर यांचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. सर्वाधिक वयोवृद्ध आमदार असलेले सरदार तारासिंग हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीत असून, त्यांना केवळ वयाचा अडसर आहे. त्यामुळे आता सरकार अल्पमतातील बनणार की शिवसेनेला घेऊन, त्यावर मुंबईच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार, हे अवलंबून असणार आहे. इच्छुकांनी मात्र मंत्रिपदांसाठीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
...मुंबईला आणखी मंत्रिपदे
By admin | Updated: October 22, 2014 06:18 IST