मुंबई : ऐन पावसाळ्यात कचऱ्याचा प्रश्न पेटत असल्याने मुंबईत या काळात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरते़ यामुळे टीकेचे धनी बनावे लागत असल्याने यंदा पालिका प्रशासनाने खरबदारी म्हणून सर्व २४ वॉर्डांना पावसाळ्यापूर्वीच साफसफाईची ताकिद दिली आहे़ या मोहिमेवर नजर ठेवण्यासाठी विभाग अधिकारी आणि उपायुक्तांना रस्त्यावर उतरुन मुंबई स्वच्छ करुन घेण्यासाठी ३१ मे पर्यंतची डेडलाईनही देण्यात आली आहे़पावसाळ्यापूर्वी नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात येते़ अनेकवेळा ठेकेदार हा गाळ काढून नाल्यांच्या तोंडावर ठेवतात़ हा कचरा उचलण्यास दिरंगाई झाल्यास पावसाळ्यात त्याची दुर्गंधी पसरु लागते़ त्यामुळे नाल्यांच्या तोंडावर साठलेला गाळ, बांधकामातून तयार झालेली दगड-मातीचा कचरा आणि ओला व सुका कचरा तत्काळ उचलला जावा, याची ताकिद अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी सर्व वॉर्डांना परिपत्रकाद्वारे दिली आहे़साफसफाईची ही मोहीम प्रत्येक वॉर्डात यशस्वी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त व उपायुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे़ सात परिमंडळाचे उपायुक्त व २४ वॉर्डांचे सहाय्यक आयुक्तांना स्वत: रस्त्यावर उतरुन कचरा उचलला जात असल्याची खातरजमा करावी लागणार आहे़ प्रामुख्याने नाल्यांमधील गाळ डंपिंग ग्राऊंडपर्यंत वेळेत पोहोचत असल्याकडे या अधिकाऱ्यांना बारकाईने लक्ष ठेवावे लागेल, असे परित्रकात निक्षून सांगण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
पावसाळ्यापूर्वी मुंबईची सफाई
By admin | Updated: May 9, 2015 01:42 IST