नागपूर : भारताचे पंतप्रधान आणि भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांची बुधवारी ७ आॅक्टोबर रोजी सांयकाळी ५ वाजता नागपूरमधील कस्तुरचंद पार्कवर निवडणूक प्रचार सभा होणार आहे. सभेला भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, रिपाइंचे (अ) अध्यक्ष खासदार रामदास आठवले, खासदार अजय संचेती व ज्येष्ठ नेते बनवारीलाल पुरोहित यांच्यासह जिल्ह्यातील १२ ही उमेदवार उपस्थित राहतील, असे पक्षाचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांची नागपूरमध्ये होणारी ही दुसरी तर पक्षाच्या निवडणूक प्रचारासाठी होणारी पहिली सभा आहे. यापूर्वी २१ आॅगस्ट रोजी मोदी नागपूरमध्ये मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजनासाठी आले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात मोदी यांची नागपूरमध्ये प्रचार सभा झाली नव्हती. विधानसभा निवडणुकीत मात्र मोदी हेच भाजपचे स्टार प्रचारक आहेत. राज्यात त्यांच्या एकूण २५ सभा आयोजित करण्यात आल्या असून त्यात विदर्भातील पाच सभांचा समावेश आहे. यापैकी ५ आॅक्टोबरला गोंदिया येथे त्यांची सभा झाली. बुधवारी ७ आॅक्टोबरला नागपूरमध्ये त्यांची सभा होणार आहे. याच दिवशी त्यांच्या खामगाव आणि सिंदखेडराजा येथेही सभा होणार आहेत. १० तारखेला ब्रम्हपुरी आणि धामणगाव येथे सभा आहेत, असे पक्षाचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.नागपूरच्या प्रचारसभेची भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील १२ ही मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांसाठी ही सभा होणार असल्याने कस्तुरचंद पार्कवर गर्दी होण्याची शक्यता आहे. मोदी खामगाव येथील सभा आटोपून नागपूरमध्ये येतील व येथून नाशिक येथे जातील, असे व्यास म्हणाले. (प्रतिनिधी)
मोदींची आज नागपुरात प्रचार सभा
By admin | Updated: October 7, 2014 01:07 IST