रोहा : केंद्र शासनाकडून सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी संलग्न करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. परंतु आधार क्रमांकाबरोबरच मोबाइल क्र मांक देखील संबंधित लाभार्थ्यांकडून घेण्याचे आदेश तहसील कार्यालयातून प्राप्त झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.सामाजिक न्यायविभागाच्या विविध योजनांसाठी जे लाभार्थी पात्र होतात त्यांची उत्पन्न मर्यादा वार्षिक १८ ते २१ हजार एवढी असते. वार्षिक १८ ते २१ हजार उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीची सध्याच्या महागाईच्या दिवसांत गुजराण होत नसल्याने संबंधित लाभार्थी शासनाकडून मिळणाऱ्या दरमहा ६०० रुपयांच्या तुटपुंज्या लाभासाठी अर्ज करत असतात. असे असताना शासनाने संबंधित लाभार्थ्यांकडून आधार क्र मांकाबरोबरच मोबाइल क्र मांक जमा करण्याचे आदेश दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मोबाइलची कमीत कमी किंमत १२०० ते १५०० रुपये असल्याने तुटपुंज्या मदतीवर आपली गुजराण करणारे लाभार्थी मोबाइल कसा काय वापरू शकतील असा प्रश्न या क्षेत्रात काम करणाऱ्या जाणकार मंडळींनी व्यक्त केला आहे. (वार्ताहर)
योजनांच्या लाभार्थ्यांना मोबाइलची अट
By admin | Updated: June 29, 2016 02:42 IST