९० दिवस काम : गोंदिया जिल्हा अंमलबजावणीत प्रथमगोंदिया : महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ९० दिवस काम करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील नोंदणीकृत (मनरेगा) बांधकाम कामगारांना आता भेटवस्तूऐवजी रोख रक्कम देण्यात येत आहे. ही योजना प्रभावीपणे राबविणारा राज्यातील पहिला जिल्हा म्हणून शासनाने गोंदिया जिल्ह्याचा गौरव केला आहे.नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आवश्यक वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून प्रत्येकी ३ हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आरटीजीएसद्वारे जमा करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी सुचविले होते. त्यानुसार शासन स्तरावर तसा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची सर्वाधिक प्रभावी अंमलबजावणी गोंदिया जिल्ह्यात करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत गोंदिया जिल्ह्यात एकूण १९८ मजुरांनी ९० दिवस काम पूर्ण केले आहे. त्या मजुरांना प्रत्येकी ३ हजार रुपयांप्रमाणे रोख रक्कम देण्यात आली. विशेष म्हणजे एखादी वस्तू भेट म्हणून देण्यापेक्षा जीवनावश्यक वस्तू घेता यावी यासाठी मजुरांच्या खात्यावर ती रक्कम आॅनलाईन पद्धतीने जमा करण्यात यावी, असे जिल्हाधिकारी डॉ.अमित सैनी यांनी सुचविले व प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणीही केली. ९० दिवस प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मजुरांची यादी तयार करण्यात आली. त्याकरिता तालुका व गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करण्यात आले. यासाठी सहायक कामगार आयुक्तालयाचीही मदत मिळाली.१९८ मजुरांना सन्मानित करणारा गोंदिया हा राज्यातील पहिला जिल्हा असल्याचे प्रमाणपत्र शासनाने प्रदान केले आहे. २०१३-१४ मध्ये गोंदिया जिल्ह्यातील नोंदणीकृत मनरेगा बांधकाम कामगारांमध्ये आमगाव तालुक्यातील २०, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील ११, देवरी येथील १६. गोंदिया तालुक्यातील ४२, गोरेगाव तालुक्यातील ४३, सडक/अर्जुनी तालुक्यातील ४, सालेकसा येथील २२ आणि तिरोडा तालुक्यातील ४० अशा १९८ जणांचा समावेश आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
मनरेगाच्या मजुरांना आता भेटवस्तूऐवजी रोख रक्कम
By admin | Updated: July 13, 2014 01:09 IST