विवेक भुसे, पुणे खासदारांबरोबरच आमदारांच्या मालमत्तेतही भरघोस वाढ होत असल्याचे नॅशनल इलेक्शन वॉचने केलेल्या अभ्यासात आढळून आले आहे. २००४ आणि २००९ च्या विधानसभा निवडणुकीत लागोपाठ यश मिळविणाऱ्या आमदारांच्या मालमत्तेत सरासरी तब्बल २१४ टक्क्यांनी वाढ झाली होती़ २००४ मध्ये आमदार झालेल्या १६४ लोकप्रतिनिधींनी २००९ मध्ये पुन्हा निवडणूक लढविली़ २००४ मध्ये १़१ कोटी रुपये असलेली त्यांची सरासरी संपत्ती २००९ मध्ये ३ कोटी रुपये झाली. पाच वर्षांत त्याच्या सरासरी संपत्तीत १़९ कोटी रुपयांची वाढ झाली. टक्केवारीच्या भाषेत ही वाढ १८१ होते़ २००४ व २००९ मध्ये निवडून आलेल्या ८३ आमदारांच्या प्रतिज्ञापत्राचा अभ्यास केल्यावर त्यांची सरासरी संपत्ती ३़५ कोटी इतकी झाली होती़ २००४ च्या तुलनेत त्यांच्या मालमत्तेत तब्बल २़४ कोटी रुपयांची वाढ झाली होती़ ही वाढ २१४ टक्के इतकी आहे़ २००४ व २००९ मध्ये निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसच्या ५८ आमदारांच्या मालमत्तेत सरासरी २ कोटी ५७ लाख (१७४ टक्के) रुपयांनी वाढ झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४८ आमदारांच्या मालमत्तेत सरासरी २ कोटी २४ लाख (१५३ टक्के) रुपये वाढ झाली़ तर भारतीय जनता पार्टीच्या ३३ आमदारांच्या मालमत्तेत १ कोटी ६१ लाख (१३१ टक्के) रुपयांनी वाढ झाली़ शिवसेनेच्या ३२ आमदारांच्या मालमत्तेत सरासरी १ कोटी (१३४ टक्के) रुपये वाढ झाली. १० अपक्ष आमदारांच्या मालमत्तेत सरासरी २ कोटी ७८ लाख (६०७ टक्के) रुपये वाढ झाली.२००४ पाठोपाठ २००९ मध्ये पुन्हा निवडून आलेल्या आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३६ आमदारांच्या मालमत्तेत १६२ टक्के, काँग्रेसच्या ३५ आमदारांच्या मालमत्तेत १९३ टक्के, भारतीय जनता पार्टीच्या १७ आमदारांच्या मालमत्तेत १६८ टक्के आणि शिवसेनेच्या १० आमदारांच्या मालमत्तेत १४९ टक्के वाढ झाल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून दिसून येते़ संबंधित १६४ आमदारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रावरून अनेक आमदारांच्या मालमत्तेत पाच वर्षांत हजार पटीहून अधिक वाढ झाल्याचे दिसून येते़
आमदार बनले धनसंपन्न !
By admin | Updated: August 18, 2014 03:40 IST