मुंबई : टाटा उद्योग समूहाच्या यशस्वी भविष्यासाठी सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या चेअरमन पदावरून हटविणे आवश्यकच होते, असे प्रतिपादन या समूहाचे हंगामी चेअरमन रतन टाटा यांनी केले आहे.टाटा यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात हे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले की, कंपनीच्या संचालक मंडळाने अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेऊन मिस्त्री यांना हटविले आहे. अत्यंत गांभीर्याने विचार केल्यानंतर मिस्त्री यांना हटविणे कंपनीच्या यशस्वी भविष्यासाठी आवश्यकच आहे, असा निष्कर्ष संचालक मंडळाने काढला आणि त्यानुसार निर्णय घेण्यात आला. आपण स्वीकारलेली जबाबदारी हंगामी स्वरूपाची आहे. कंपनीला लवकरच योग्य नेतृत्व दिले जाईल. सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर टाटा उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेले रतन टाटा यांचे हे दुसरे पत्र आहे. टाटा यांनी पत्रात म्हटले की, समूहाच्या कंपन्यांनी आपल्या नफ्यावर आणि बाजारातील स्थानावर लक्ष केंद्रित करावे. (प्रतिनिधी)
‘मिस्त्री यांना हटविणे आवश्यकच होते!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 06:36 IST