शिर्डी : स्वच्छता व पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी सोमवारी येथे कृषी विद्यापीठांच्या कामकाजावरून खडेबोल सुनावले. कृषी विद्यापीठांकडे हजारो एकर जमिनी पडीक आहेत़ तेथे विविध पिके घेऊन त्यावरील संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना झाला असता तर आत्महत्येचे प्रमाण रोखता आले असते, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.येथील डाळिंब परिसंवादात बोलताना त्यांनी कृषी विद्यापीठांच्या कामकाजावर एक प्रकारे कोरडेच ओढले. डाळिंबावर तेल्या रोगामुळे आलेले संकट दूर करण्यासाठी कृषी विभाग व कृषी विद्यापीठांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने संशोधन करून ते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवावे, असे त्यांनी सांगितले.देश-विदेशातील आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन विद्यापीठांनी डाळिंबाचे रोगमुक्त नवीनवाण विकसित करावे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी संरक्षण मिळावे. त्यांना अनुदानावर खत व औषधे मिळावीत, यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा घडवून आणण्याचे आश्वासनही त्यांनी दिले़मी स्वत: शेतकरी असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या मला माहीत आहेत़ लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन शेती व्यवसायाला संरक्षण व उद्योगाचा दर्जा प्राप्त करून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले़देशातील तीर्थक्षेत्रे स्वच्छ करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे़ संबंधित शहरांमध्ये शिर्डीचा अंतर्भाव व्हावा, यासाठी प्रयत्न करू. येथील घनकचरा प्रकल्पाकरिता केंद्राकडून निधी आणण्यात येईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
मंत्री लोणीकर यांचा कृषी विद्यापीठांना डोस
By admin | Updated: February 3, 2015 02:02 IST