मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून राज्यमंत्र्यांना डच्चू देण्यात आला आहे. संबंधित राज्यमंत्र्यांच्या खात्याचा विषय अजेंड्यावर असेल तरच त्यांना बैठकीला बोलविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.आघाडी सरकारच्या काळात आधी राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ बैठकीला बोलविले जात नव्हते. तथापि, आम्हाला काहीही अधिकार नाहीत, असा नाराजीचा सूर राज्यमंत्र्यांनी लावला तेव्हा त्यांच्या समाधानासाठी त्यांना मंत्रिमंडळ बैठकीत बसण्याची संधी देण्यात आली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यास अनुमती दिली होती. त्यामुळे सर्वच राज्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीला बसायचे. त्यामुळे त्या बैठकीला मंत्रिपरिषदेची बैठक असे संबोधले जाई. सध्या मंत्रिमंडळात दहा राज्यमंत्री आहेत पण त्यांना मंत्रिमंडळ बैठकीला बोलविले जात नाही. ज्या खात्याचा विषय अजेंड्यावर आहे, त्या खात्याच्या राज्यमंत्र्यांनाच तेवढे बोलविले जाते. मंत्रिपरिषदेची बैठक असेल तर कॅबिनेट आणि राज्यमंत्री असे दोघेही असतात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यमंत्री अपेक्षित नसतात, असे एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
मंत्रिमंडळाच्या बैठकीतून राज्यमंत्र्यांना खो !
By admin | Updated: January 14, 2015 04:22 IST