मुंबई : एमआयएम (आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तिहादूल मुस्लिमिन) म्हणजे अल्पसंख्याक मते फोडण्यासाठी भाजपाने तयार केलेले पिल्लू आहे. हे पिल्लू नसते तर काँग्रेसचे अनेक खासदार निवडून आले असते, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनी रविवारी येथे केला़वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील खेरवाडी येथे मुख्य प्रचार कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसचे निरीक्षक मोहन प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले़ त्यानंतर झालेल्या सभेत राणे बोलत होते़याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, राज बब्बर, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम, आ. नसीम खान, माजी खासदार प्रिया दत्त, जनार्दन चांदूरकर आदी उपस्थित होते. राणे यांनी या वेळी शिवसेना व एमआयएमला लक्ष्य केले. मराठी, हिंदुत्व आणि मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जातेय, या भावनिक मुद्द्यांवरच शिवसेनेने आपली दुकानदारी केल्याची टीका राणे यांनी केली. २५ वर्षांपूर्वी मी कोकणात गेलो तेव्हा सिंधुदुर्ग मागास जिल्हा होता. पण आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी इंग्रजी शाळा, इंजिनीअरिंग कॉलेज, हॉर्टिकल्चर कॉलेज, रस्ते इ. सुविधा उपलब्ध करून दिल्याचे राणे म्हणाले. मुंबई महापालिकेत २२ वर्षांपासून सत्ता असूनही युतीला मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात अपयश आल्याचे सांगून राणे म्हणाले, की आताही येथे गडबड करण्यासाठी हैदराबादवरून मंडळी आल्याची खबर मला मिळाली आहे. मात्र आम्ही सर्वधर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने नांदत आहोत. बाहेरून येऊन मस्ती कराल तर ती खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)
एमआयएम हे तर भाजपाचे पिल्लू !
By admin | Updated: March 30, 2015 04:07 IST