विकास राऊत, औरंगाबादसार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील विविध कामांचे ३ हजार ६४८ मेजर बुक (काम मापक पुस्तिका) गहाळ झाले आहेत. साधारणपणे एका बुकमध्ये १ लाख ते १ कोटी रुपयांच्या कामांच्या नोंदी असतात. मेजरबुकचे रेकॉर्ड विभागाकडे नसल्यामुळे कोणत्या कामाचे कसे व किती बिल अदा केले गेले आहे, याचा लेखाजोखा लेखा विभागालाही सांगता येत नाही. दुष्काळ आणि पाणीटंचाईला जिल्हा सामोरा जात असतानाच सर्कलमध्ये झालेल्या कोट्यवधी कामांचे मेजर बुकबदली होऊन गेलेले अभियंते, कंत्राटदार यांनीच गायब केल्याची चर्चा आहे. सार्वजनिक बांधकाम उत्तर उपविभागातील सर्वाधिक ९७१ मेजरबुक गहाळ झाले आहेत. त्याखालोखाल उपविभाग क्र.१ मधील ८३७ मेजरबुक गहाळ आहेत. सूत्रांच्या मते कनिष्ठ, शाखा अभियंता यांची बदली झाल्यास मेजर बुकची देवाण-घेवाण केली जाते. त्याची कुणालाही माहिती नसते. चुकून कंत्राटदाराच्या घरी मेजर बुक राहतात. मेजर बुक शोधण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. प्रत्येक विभागातील १ हजारपैकी ७०० मेजरबुक कार्यालयाबाहेर आहेत.
औरंगाबादमध्ये कोट्यवधींच्या कामांच्या पुस्तिका गहाळ
By admin | Updated: May 16, 2015 02:47 IST