मुंबई : म्हाडाच्या राज्यातील विविध मंडळांमार्फत पुढील वर्षी ३० हजार परवडणारी घरे बांधण्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी केली. कोकण मंडळातील ४ हजार २७५ घरांची सोडत बुधवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडली, त्या वेळी महेता बोलत होते.महेता म्हणाले की, ‘या वर्षी एकूण १० हजार परवडणाऱ्या घरांची सोडत होत आहे. त्यात पुणे मंडळातील २ हजार ४००, मुंबई मंडळातील १ हजार १०० आणि गिरणी कामगारांसाठीच्या २ हजार ६०० घरांचा समावेश आहे, शिवाय आज ४ हजार २७५ घरांची सोडत झाली आहे. मात्र, आजच्या सोडतीसाठी एकूण १ लाख ३४ हजार १२४ अर्जदारांनी अर्ज केले, ही फार मोठी तफावत आहे. ती भरून काढण्यासाठी पुढील वर्षी एकूण परवडणाऱ्या घरांची संख्या ३० हजारांपर्यंत नेणार आहे. मुंबईतील वरळी, नायगाव आणि डिलाईल रोड येथील बीडीडी चाळींसोबतच शिवडी बीडीडी चाळीचा पुनर्विकास होईल, असेही महेता यांनी सांगितले. ते म्हणाले की, ‘मुंबई पोर्ट ट्रस्टचे महाव्यवस्थापक रवी परमार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत राज्य सरकारची बैठक झाली. त्यात शिवडी बीडीडीचा पुनर्विकास अन्य बीडीडी चाळींसोबतच करण्यास केंद्राने तत्त्वत: परवानगी देत, प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे.’
म्हाडाची पुढच्या वर्षी ३० हजार घरे
By admin | Updated: February 25, 2016 04:42 IST