मुंबई : राज्य सरकार नव्याने गृहनिर्माण धोरण तयार करीत असून त्याच्या मसुद्यावर सर्व सदस्यांचे मत घेतल्यानंतरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. त्याआधी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी मुंबईतील म्हाडाच्या जागेवरील प्रस्तावित झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हाडा करणार नाही, असे जाहीर केले. प्रकाश बिनसाळे यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईत महापालिकेच्या जागेवर १२९ तर म्हाडाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसनाचे ९६ प्रस्ताव प्रलंबित आहेत. म्हाडाच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हाडा स्वत: करणार असा निर्णय सरकारने तीन वर्षांपूर्वी केला होता. त्यामुळे या योजना रखडल्या. पण, तीन वर्षांमध्ये म्हाडाने काहीही केले नाही. म्हाडाने अशा योजना करण्याबाबत हतबलता दाखविली आहे. त्यामुळे या योजना कार्यान्वित करण्यासाठी बाहेरच्या विकासकाला परवानगी देण्यात येईल, असे मेहता यांनी सांगितले. नव्या गृहनिर्माण धोरणात परवडाणा-या घरांची जास्तीतजास्त निर्मिती करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजना तसेच गृहनिर्माण मंडळाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
झोपू योजनेतून म्हाडाची माघार
By admin | Updated: April 8, 2015 22:58 IST