मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीकरिता शिवसेनेचे सुभाष देसाई, शिवसंग्रामचे विनायक मेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून, चौथ्या जागेकरिता भाजपात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपाने आपल्या मित्रपक्षांना विधान परिषदेच्या जागा सोडताना या जागेकरिता इच्छुक असलेल्या स्वपक्षीयांची घोर निराशा केली आहे.शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले सुभाष देसाई यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश केल्याने देसाई यांना सहा महिन्यांत दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य होणे गरजेचे होते. त्यामुळे देसाई यांना विधान परिषदेचे दार भाजपाने उघडून दिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर युती तुटल्यावरही भाजपासोबत राहिलेल्या विनायक मेटे व महादेव जानकर यांना विधान परिषदेवर धाडण्याचा निर्णय घेतला आहे.मेटे हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपात दाखल झाले तेव्हा विधान परिषदेचे सदस्य होते. त्याची भरपाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांची केवळ एक जागा निवडून आली व ती जानकर यांच्या रासपाची होती. त्यामुळे जानकर यांना परिषदेची संधी दिली जात आहे. रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपाइंला मात्र विधान परिषदेची जागा सोडण्यात आली नाही. (विशेष प्रतिनिधी)
विधान परिषदेसाठी मेटे, जानकरांची उमेदवारी निश्चित
By admin | Updated: January 20, 2015 02:16 IST