ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर ठाण्यात मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवातीबाबत चर्चा करण्यासाठी २५ जून रोजी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसह ठाण्यातील लोकप्रतिनिधींची मंत्रालयात बैठक होणार आहे. त्या दृष्टीने ठाणे महापालिका आयुक्त असीम गुप्ता, आमदार प्रताप सरनाईक आणि स्थानिक नगरसेवक नरेश मणेरा यांनी ठाणे ते कासारवडवली मार्गाची तसेच कारशेडसाठी आरक्षित जागेचीही पाहणी केली. त्यामुळे लवकरच ठाणे मेट्रो साकारण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुंबईत मेट्रो धावू लागल्यावर नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई येथे मेट्रोच्या कामाला सुरुवात होऊ घातली आहे. परंतु यापूर्वीच मागणी केलेल्या ठाण्यातही मेट्रो धावावी आणि त्याचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी आमदार सरनाईकांनी मागणी केली होती. यासंदर्भात एमएमआरडीएच्यावतीने मंत्रालयात बैठक आयोजिली आहे. त्या दृष्टीने रविवारी असीम गुप्ता यांनी आमदार सरनाईक आणि इतर सहकाऱ्यांसह या मार्गाची पाहणी केली. कारशेडसाठी आरक्षित केलेल्या कासारवडवली येथील ४० हेक्टर जागेचीही पाहणी केली. मुख्य म्हणजे या मेट्रो प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या घोडबंदर मार्गावरील ग्रामस्थांच्या जमिनींना एक चटईक्षेत्र निर्देशांक अथवा पैशाच्या स्वरूपात मोबदला देण्याचे महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी मान्य केले. यासंदर्भातील निर्णय बैठकीत घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. (प्रतिनिधी)
ठाणे मेट्रोबाबत २५ जूनला मंत्रालयात बैठक
By admin | Updated: June 23, 2014 04:08 IST