ठाणे : ठाण्याचे महापौरपद निष्ठावंत असलेल्या मीनाक्षी शिंदे यांच्याकडे सोपवले जाण्याची दाट शक्यता आहे. त्याचवेळी उच्चशिक्षित व्यक्तीकडे हे पद सोपवावे, हा निकष लावला तर नंदिनी विचारे यांचा विचार होऊ शकतो, असे दिवसभरातील घडामोडीतून स्पष्ट झाले.राष्ट्रवादीही महापौरपदासाठी अर्ज भरणार आहे. त्यांच्याकडून तीन नावांची चर्चा सुरू असून ही नावे खाडीपलीकडचीच असल्याचे बोलले जाते. ज्या घोडबंदरने शिवसेनेच्या पदरात भरभरून दान टाकले त्या परिसराला यानिमित्ताने न्याय देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. वागळे इस्टेटच्या सैनिकांचाही या पदावर दावा होता. पण त्यांना गटनेतेपद देऊन त्यांचे समाधान करण्यात आले. महापौरपदाची निवडणूक ६ मार्चला होणार असून गुरुवारी अर्ज भरला जाईल. या पदासाठी कोणाला लॉटरी लागणार, यावरून उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला खलबते सुरू होती. निष्ठावान म्हणून पहिली पसंती घोडबंदरच्या मीनाक्षी शिंदे यांना दिली जात असून त्यांच्या खालोखाल वागळे पट्ट्यातील एकता भोईर, कळव्याच्या अनिता गौरी आणि मग सुशिक्षित म्हणून ओळख असलेल्या नंदिनी विचारे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू होती. परंतु, यंदा निष्ठावंतांना न्याय देण्याच्या भूमिकेत शिवसेनेची वरिष्ठ पातळीवरील नेतेमंडळी आल्याने घोडबंदर पट्ट्याला प्रथमच न्याय देण्याचा विचार सुरू झाला आहे. यापूर्वी घोडबंदर पट्ट्याला उपमहापौरपद मिळाले होते. त्यानंतर, आता महापौरपद मिळेल. दरम्यान, दुसरीकडे वागळे पट्ट्यातील एकता भोईर यांचे नावही चर्चेत असले तरी यापूर्वी अनेकदा वागळे पट्ट्याला न्याय दिला गेला आहे. त्यामुळे आता हा पट्टा कशासाठी, असा सूरही लावला जात आहे. त्यातही कळव्यातून अनिता गौरी यांचे नावही काहीसे चर्चेत असून कळव्यालादेखील यापूर्वी उपमहापौरपद मिळालेले आहे. गौरी या उच्चशिक्षित असल्याचा फायदा आहे. परंतु, नंदिनी विचारे यांच्या नावावरूनदेखील दिवसभर खलबते सुरू होती. त्या खासदार राजन विचारे यांची पत्नी असून त्या सुशिक्षित आहेत. तसेच त्यांचा चांगला अभ्यास असून त्यांनाच महापौरपद मिळावे, यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात आहे. (प्रतिनिधी) >सरनाईक, फाटक यांची नावे पडली मागेपरिषा सरनाईक आणि जयश्री फाटक यांचे नाव सकाळपर्यंत चर्चेत होते. परंतु, सायंकाळी या सर्वांचीच नावे पिछाडीवर पडून केवळ मीनाक्षी शिंदे आणि नंदिनी विचारे यांच्याच नावाची चर्चा सुरू झाली होती. आता यातून कोण अर्ज भरणार, हे पाहणे याकडे लक्ष लागले असून श्रेष्ठी निष्ठवंतांना न्याय देणार की, पुन्हा घराणेशाहीच्या गळ्यात महापौरपदाची माळ घालणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.दरम्यान, शिवसेनेत महापौरपदावरून चांगलेच रान पेटले असताना आता राष्ट्रवादीनेदेखील महापौरपदासाठी लॉबिंग सुरू केले असून त्यांनीदेखील महापौरपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार उभा करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळेच आता बिनविरोध होणाऱ्या निवडणुकीसाठी आतुर असलेल्या शिवसेनेला आता महापौरपदाची निवडणूक लढवावी लागणार असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीतून खाडीपलीकडील तीन नावांची चर्चा सुरू आहे.
मीनाक्षी शिंदे महापौर?
By admin | Updated: March 2, 2017 03:38 IST