१५ जुलैला होणार घोषणा : केंद्राकडे प्रस्ताव सादरनागपूर : मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाने (एमसीआय) मागील शैक्षणिक वर्षात वाढविलेल्या राज्यातील एमबीबीएसच्या ५०० जागा पायाभूत सुविधांचे कारण पुढे करून यावर्षी राखून ठेवल्या होत्या. एमसीआयने या संदर्भात शनिवारी बैठक बोलाविली होती. यात या जागांवर सकारात्मक निर्णय घेत मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविल्याची व १५ जुलैला यावर घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या बैठकीत पश्चिम बंगालमधील रद्द केलेल्या १०५० मेडिकलच्या जागा पुन्हा बहाल करण्याचा निर्णय घेण्यात आला.एमसीआयने मागील शैक्षणिक वर्षात देशातील एमबीबीएसच्या ३००० जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम वर्ष एमबीबीएसची प्रवेशक्षमता ५० व १०० असणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना प्रत्येकी ५० वाढीव जागा मिळणार होत्या. महाराष्ट्रात २०६० जागांवरून २५६० जागांवर यावर्षी प्रवेश मिळणार होते, परंतु एमसीआयने ५०० जागा राखून ठेवल्याने जुन्याच जागांवर या वर्षी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. गेलेल्या जागा मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, केंद्रीय आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी संयुक्त प्रयत्न चालविले होते. या विषयावर एमसीआयने देशभरातील आरोग्य शिक्षण विभागाची आज बैठक बोलाविली होती. यात राज्यातील वैद्यकीय शिक्षण संचालक आणि नऊ मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता बैठकीत उपस्थित होते. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर या गैरहजर होत्या. त्यांच्या अनुपस्थितीमुळे एमसीआयच्या सचिवांनी नाराजी व्यक्त केली. परंतु सर्वांनी मिळून त्यांची नाराजी दूर केल्याने ५०० जागांवर सकारात्मक निर्णय घेत मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला. (प्रतिनिधी)
मेडिकलच्या ५०० जागांचा तिढा सुटणार!
By admin | Updated: July 13, 2014 00:59 IST