ठाणे : सरकारच्या गेल्या वर्षीच्या परिपत्रकात अ आणि ब वर्गांतील महापालिकांना अंबर दिवाच वापरता येऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, ठाण्याच्या महापौरांच्या गाडीवर आजही लाल दिवाच लावला आहे. यासंदर्भात पालिका अथवा ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईच केली नसल्याची माहितीदेखील समोर आली आहे.सरकारी यंत्रणेतील उच्चपदावरील अधिकाऱ्यांना त्यांच्या दर्जानुसार वाहनांवर दिवे लावण्याचे अधिकार आहेत. नव्या परिपत्रकात त्यांच्या दर्जानुसार लाल, निळा, अंबर असे दिव्यांचे वर्गीकरण करून ते दिवे लावण्याबाबतच्या सूचना त्यांना केल्या आहेत. मात्र, त्या सूचनांचे पालन होत नसल्याचे महापौर संजय मोरे यांच्या वाहनावर आजही असलेल्या लाल दिव्याकडे पाहून स्पष्ट होते. दरम्यान, फ्लॅशर असलेला लाल दिवा हा राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य न्यायाधीश आदींच्या वाहनांवर तर फ्लॅशरविना लाल दिवा विधान परिषद उपसभापती, विधानसभा उपाध्यक्ष, राज्यमंत्री, लोकसेवा आयोग अध्यक्ष, मुख्य माहिती आयुक्त आदींच्या वाहनांवर लावला जातो. अप्पर सचिवांपासून पोलीस महासंचालक, जिल्हा परिषद अध्यक्ष, अ व ब वर्ग महापालिक ांचे महापौर-आयुक्त, प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या वाहनांवर फ्लॅशरविना अंबर दिवा लावण्यात यावा, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचे पालन करणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)
महापौरांच्या गाडीवरचा लाल दिवा हटेना
By admin | Updated: January 31, 2015 05:20 IST