मुंबई : भाजपाने मुंबईत सर्वत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रांचे होर्डिंग लावले आहेत. मोदींचे इतके होर्डिंग बघून निवडणुकीनंतर मुंबई महापालिकेत नरेंद्र मोदीच महापौर बनणार की काय, असा प्रश्न पडल्याचे काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्याशिवाय भाजपाकडे चेहराच नसल्याने विविध राज्यांतील निवडणुकांपासून महापालिका व स्थानिक निवडणुकीतही त्यांनाच पुढे केले जात असल्याचे तिवारी म्हणाले. मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मनिष तिवारी बोलत होते. या वेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम उपस्थित होते. सध्या भाजपा आणि शिवसेनेतील कलगीतुरा म्हणजे मुंबईकरांच्या डोळ्यांतील धूळफेक असल्याचा आरोप तिवारी यांनी केला. मुंबईत जी काही विकासकामे झाली ती काँग्रेस सरकारच्या काळात झाली. मेट्रो रेल, मोनो रेल, फ्री-वे, सी-लिंक ही सर्व कामे आमच्या काळात झाली, असा दावाही मनिष तिवारी यांनी केला. (प्रतिनिधी)
मुंबईचे महापौर नरेंद्र मोदीच बनणार - तिवारी
By admin | Updated: February 17, 2017 03:15 IST