कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महापौर तृप्ती अवधूत माळवी यांना आज, शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या कार्यालयात खासगी स्वीय सहायकासह १६ हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. महापालिकेच्या मालकीच्या जागा देण्याच्या ठरावावर सही करण्यासाठी त्यांनी ४० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. लाच घेताना महापौरांना त्यांच्याच केबिनमध्ये पकडण्याची राज्यातील ही पहिली घटना असून, या प्रकारामुळे कोल्हापूर शहरासह जिल्'त एकच खळबळ उडाली आहे. तृप्ती माळवी या गेल्या सात महिन्यांपासून महापौर म्हणून कार्यरत आहेत. रस्ता रुंदीकरणात गेलेल्या जागेच्या मोबदल्यात महापालिकेची काही जागा पाटील नावाच्या एका व्यक्तीला देण्याचा ठराव झाला होता. त्यावर सही करण्यासाठी महापौर माळवी यांनी संबधित व्यक्तीकडे ४० हजारांची लाच मागितली होती. त्याने ती कबूल करीत याबाबतची माहिती लाचलुचपत विभागाला दिली होती. आज पाटील ठरल्याप्रमाणे सायंकाळी पैसे घेऊन महापालिकेत गेले व तेथून त्यांनी महापौर माळवी यांना फोन लावला. माळवी यांनी त्यांचे स्वीय सहायक अश्विन गडकरी यांना पैसे घेण्यासाठी पाठवून दिले. पण ४० ऐवजी १६ हजारच आपल्याकडे असल्याचे सांगितल्याने स्वीय सहायकांनी महापौर माळवी यांना फोन केला. त्यानंतर माळवी यांनी संबंधितांना थेट आपल्या केबिनमध्येच बोलावले. तिथेच १६ हजार रुपये घेताना त्यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी महपालिकेच्या ठरावाची प्रतही ताब्यात घेतली. त्यावेळी फिर्यादी आणि महापौरांचे फोनवर बोलणे झाले. फोनवरील बोलणे संपताच काही पोलिसांनी अश्विन गडकरी याला ताब्यात घेतले आणि गाडीतून घेऊन गेले. त्याच वेळी काही पोलीस थेट महापौर कार्यालयात गेले. त्यांनी महापौर माळवी यांना लाचलुचपतचे अधिकारी असल्याचे सांगून, लाच स्वीकारल्याप्रकरणी आम्ही तुम्हास ताब्यात घेतल्याचे सांगत, त्यांना आपल्यासोबत येण्यास बजावले. यावेळी महिला पोलीसही त्यांच्यासोबत होत्या. यावेळी महापौर माळवी यांनी कोणतेही आढेवेढे घेतले नाहीत. त्या स्वत: महापालिकेच्या वाहनातून भाऊसिंगजी रस्त्यावरील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात गेल्या. संपूर्ण महापालिका हादरली... महापौर माळवी यांना लाच घेताना पकडल्याची माहिती महापालिकेसह संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. महापौर कार्यालयातील सर्व कर्मचारी तर या कारवाईवेळी अक्षरश: पळून गेले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना ही माहिती कळताच त्यांनी आपली कार्यालये सोडून घर गाठले. काही अधिकाऱ्यांनी तर आपले मोबाईलही बंद केले. आजच्या कारवाईमुळे संपूर्ण महापालिकेवर भीतीची छाया होती. आतापर्यंत काही अधिकारी लाच घेताना पकडले गेले असले तरी त्यांच्यावरील कारवाई ही महापालिकेच्या बाहेर झाली होती; परंतु आजची कारवाई चक्क महापालिकेच्या कार्यालयात झाल्यामुळे संपूर्ण महापालिका हादरली. चौकट-आज अटक शक्य!न्यायालयाच्या निर्देशानुसार सूर्यास्तानंतर महिलांना अटक करता येत नसल्याने आज, सायंकाळी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी माळवी यांचा जाबजबाब घेतला. उद्या त्यांना अटक करणार असल्याचे या विभागातील अधिकृत सूत्रांनी सांगितले.
कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी अॅँटी करप्शनच्या जाळ्यात,
By admin | Updated: January 30, 2015 21:23 IST