वडगाव मावळ : मावळ पंचायत समिती सभापती व उपसभापतिपदाची निवडणूक १४ मार्चला होणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी नीलेश काळे यांनी दिली. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दहापैकी सहा जागा जिंकून पंचायत समितीवर आपला झेंडा फडकवला आहे. वडगाव गणातून गुलाबराव म्हाळसकर, टाकवे बुद्रुक गणातून शांताराम कदम, चांदखेड गणातून निकिता घोटकुले, इंदोरी गणातून ज्योती शिंदे, खडकाळा गणातून सुवर्णा कुंभार, तर महागाव गणातून जिजाबाई पोटफोडे हे उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी कॉँग्रेसला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. सभापती आणि उपसभापति पदाची निवडणूक १४ मार्चला होणार आहे. पंचायत समितीत भाजपाचे बहुमत असल्याने ही दोन्ही पदे पक्षाकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. सभापती नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने वडगाव गणातून विजयी झालेले गुलाबराव म्हाळसकर, खडकाळा गणातून विजयी झालेल्या सुवर्णा कुंभार व महागाव गणातून विजयी झालेल्या जिजाबाई पोटफोडे असे तीन उमेदवार या पदासाठी पात्र असलेले सदस्य भाजपाकडे आहेत. त्यातून सभापतिपदाची प्रथम संधी गुलाबराव म्हाळस्कर यांना तर उपसभापतिपदाची संधी निकिता घोटकुले यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. सभापती व उपसभापती पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या समर्थकांनी वरिष्ठांकडे लॉबिंग सुरू केले आहे. त्यामुळे कोणाची लॉटरी लागते याची उत्सुकता आहे. (वार्ताहर)>ओबीसींना न्याय मिळणार? मावळ पंचायत समितीची सभापतिपद हे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे भाजपामधून या जागेसाठी निवडून आलेल्या तीन सदस्यांपैकी खडकाळा गणातून निवडून आलेल्या सुवर्णा कुंभार याच फक्त मूळ ओबीसी उमेदवार आहेत. उरलेले दोन सदस्य कुणबी दाखल्यावर निवडणूक लढवून निवडून आले आहेत. त्यामुळे सभापतिपद मूळ ओबीसीला मिळणार की कुणबी दाखल्यावर निवडून आलेल्या सदस्याला, याबाबत चर्चा रंगली आहे.
मावळ सभापती १४ मार्चला
By admin | Updated: March 6, 2017 00:42 IST