भुसावळ : रेल्वेच्या देखभाल व दुरुस्ती विभागात मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण शहर हादरले. स्फोटात लीलाधर पाटील व युनूस तडवी हे दोन रेल्वे कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे स्फोट झाल्याचा आरोप नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने केला असून आरओएच शेडमधील (रेल्वे डबे व पेट्रोल टँकची नियमित दुरुस्ती व देखभाल करणारा विभाग) काम बंद पाडले. अंगावर शहारे आणणाऱ्या घटनेची अधिकृत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रेल्वे यार्डातील देखभाल व दुरुस्ती विभागात मंगळवारी सकाळी ९.२५ वाजता कामाला सुरुवात झाली. वेल्डर लीलाधर हरी पाटील (५५) हे दुरुस्तीसाठी आलेल्या पेट्रोल टँकचे झाकण काढत होते. झाकणाचा एक नट निघत नसल्याने त्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने तो काढण्यास सुरुवात करताच मोठा स्फोट झाला. (प्रतिनिधी)
भुसावळला रेल्वेच्या यार्डात भीषण स्फोट
By admin | Updated: December 3, 2014 03:45 IST