- जमीर काझी, मुंबईगेल्या तब्बल ८४ दिवसांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या निवृत्तीच्या उंबरठ्यावरील अप्पर महासंचालक के.एल. बिष्णोई यांची अखेर महासंचालक (डीजी) पदावर सोमवारी पदोन्नती करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळांचे कार्यकारी संचालकपद अपग्रेड करण्यात आले आहे. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) महासंचालकपद रिक्तच राहिले असून त्यासाठी सेवाज्येष्ठतेवर पात्र असलेले राकेश मारिया हे गृहरक्षक दलाच्या (होमगार्ड) महासमादेशक पदावरच रिटायर होतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. राज्य सरकारची ‘वक्र’दृष्टी असलेल्या मारिया यांची एसीबीच्या प्रमुखपदी नियुक्ती करता येऊ नये, यासाठीच ‘एमएसएससी’चे पद तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत करण्यात आले असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. बिष्णोई हे ३० नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत असून त्यांना डीजी म्हणून ३७ दिवस मिळणार आहेत. गेल्या १३ महिन्यांपासून होमगार्डमध्ये कार्यरत असलेले मारिया हे पुढच्या वर्षी ३१ जानेवारीला रिटायर होत आहेत. सध्याच्या सहा डीजीमध्ये पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्यानंतर तेच ज्येष्ठ अधिकारी आहेत. मात्र त्यांना ‘नॉन केडर’ पदावर कार्यरत ठेवण्यात आले आहे.३१ जुलैला राज्याच्या पोलीस दलाच्या प्रमुखपदी सेवाज्येष्ठतेनुसार १९८१ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी माथूर यांची निवड केली. मात्र एसीबीचे महासंचालकपद रिक्तच ठेवून त्याचा अतिरिक्त कार्यभार अप्पर महासंचालक विवेक फणसाळकर यांच्याकडे देण्यात आला. ‘सिनियॉरिटी’च्या आधारावर त्या पदावर माथूर यांच्याच बॅचचे राकेश मारिया यांचा हक्क आहे. ‘राष्ट्रवादी’च्या नेत्यांच्या कथित गैरव्यवहाराची अनेक प्रकरणांची चौकशी एसीबीकडून सुरू आहे. त्यामुळे मारिया यांच्याकडे त्याचा पदभार देण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा नाही. अन्य अधिकाऱ्याची एसीबीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यास त्याला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. १९८६च्या आयपीएस बॅचचे के.एल. बिष्णोई हे महासंचालकपदाच्या प्रमोशनसाठी १ आॅगस्टपासून पात्र होते. ३० नोव्हेंबरला रिटायर होणार असल्याने डीजी म्हणून चार महिने मिळणार होते. मात्र त्यांना तातडीने पदोन्नती द्यावयाची झाली असती तर मारिया यांच्याकडे एसीबीचा पदभार देणे अपरिहार्य होते. अप्पर महासंचालक दर्जाराज्यात महासंचालक दर्जाच्या सहा पदांना मंजुरी आहे. जावेद अहमद यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती केल्यानंतर राज्य सुरक्षा महामंडळांचा कार्यकारी संचालक दर्जा पदावनत करून अप्पर महासंचालकाचा करण्यात आला.
मारिया ‘होमगार्ड’मध्ये सेवानिवृत्त?
By admin | Updated: October 25, 2016 02:48 IST