पुणे : महाराष्ट्राच्या काही भागांतून पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून माघारी फिरणार असून मराठवाडा मात्र अजूनही दुष्काळीच राहिला आहे. राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या २५ ते ५० टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. पावसाळी हंगामात सुरुवातीपासून शेवटपर्यंत मराठवाड्यात तुरळक पाऊस झाल्याने संपूर्ण वर्ष टंचाईच्या स्थितीचा सामना करावा लागणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सरासरीएवढा पाऊस झाला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस झाला. विदर्भात सरासरीच्या केवळ १२ टक्के पाऊस कमी झाला. तर मराठवाड्यात सरासरीच्या ३९ टक्के कमी पाऊस झाला. राज्यात सर्वांत कमी म्हणजे सरासरीच्या ५० टक्के कमी पाऊस परभणी जिल्ह्यात झाला. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यात सरासरीच्या ४९, हिंगोली जिल्ह्यात ४८, लातूर जिल्ह्यात ४०, जालना जिल्ह्यात ३५, बीड जिल्ह्यात ३४, वाशिम जिल्ह्यात ३० आणि चंद्रपूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची प्रत्येकी २५ टक्के तूट आहे. सांगली जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे सरासरीच्या १५ टक्के अधिक पाऊस झाला. त्यापाठोपाठ धुळे जिल्ह्यात सरासरीच्या ११, मुंबई उपनगरात सरासरीच्या १० टक्के अधिक पाऊस पडला आहे. राज्यातील ९ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक तर १५ जिल्ह्यांमध्ये सरासरीएवढा पाऊस झाला. (प्रतिनिधी)
मराठवाडा अजूनही दुष्काळीच!
By admin | Updated: September 29, 2014 05:37 IST