ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 31 - शहरातील आठ चौकांमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी चक्काजाम आंदोलन करण्यात आल्याने अक्षरश: शहर जाम होते. या आंदोलनाला दोन ठिकाणी गालबोट लागले, तर काही चौकांमध्ये नागरिक, पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची होण्याच्या घटना घडल्या. तर वाळूज, हर्सूल सावंगी येथे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. आकाशवाणी चौकात आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महानुभव आश्रम चौकात बसच्या काचा फोडण्यात आल्या. शहरात चक्काजाम होणार असल्यामुळे नागरिकांनी दुपारी १२ वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचा निर्णय घेतला तर काही बाजारपेठा व्यापाऱ्यांनी स्वत:हून बंद ठेवल्या. प्रत्येक चौकात समाजातील लहान-थोरांपर्यंत सर्व मंडळी समाजाच्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करीत रस्त्यावर उतरली. महिला व तरुण, तरुणींचा यामध्ये लक्षणीय सहभाग होता. भगव्या ध्वजासह भजन, घोषणा, मागण्यांची फलके घेऊन प्रत्येक जण चौकाचौकात ठिय्या देत होता. समाज बांधवांनी प्रत्येक चौकात हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती.जालना रोडवरील केंब्रिज शाळा चौक, हर्सूल टी पार्इंट, दौलताबाद टी पॉर्इंट, सावंगी नाका, महानुभव आश्रम चौक, सिडको बसस्थानक, आकाशवाणी चौक, लिंबेजळगाव फाटा या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आकाशवाणी चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलांनी पोलिसांच्या वाहनांना घेरून जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी पोलीस आयुक्त अतिमेशकुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सिडको बसस्थानक परिसरातील वसंतराव नाईक चौकात झालेल्या आंदोलनात एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, शिक्षणतज्ज्ञ मधुकरअण्णा मुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, प्रा. चंद्रकांत भराट, प्रा. माणिकराव शिंदे, माजी नगरसेवक विठ्ठलराव जाधव, किशोर चव्हाण, अप्पासाहेब कुऱ्हेकर आदींसह हजारो समाजबांधव या चौकात घोषणाबाजी करीत होते. प्रत्येक चौकात गर्दी कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आणि समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकार गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे ३१ जानेवारी २०१७ रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलनाची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी दिल्यानंतर समाज पुन्हा शांततेत रस्त्यावर उतरला, परंतु काही ठिकाणी गालबोट लागण्यासारख्या घडल्या. ९ आॅगस्ट २०१६ रोजी समाजाने मराठा क्रांती मोर्चाची मुहूर्तमेढ या शहरात रोवल्यानंतर राज्यभर मराठा समाजाचे ३० मोर्चे निघाले. शांतता आणि शिस्त व स्वच्छता यामुळे मोर्चांची ऐतिहासिक नोंद झाली.
मराठा समाजाने केले शहर जाम; पोलिसांचा लाठीचार्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2017 6:24 PM