ठाणे : शिवसेनेचे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार राजन विचारे हे खासदार झाल्यामुळे चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना येथून कुणाला उमेदवारी देणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तर लोकसभा निवडणुकीत बजावलेल्या कामगिरीच्या आधारे शिवसेनेतील अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. २००९च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारासंघ शिवसेनेच्या वाट्याला होता. व त्यात राजन विचारे हे दणदणीत बहुमताने विजयी झाले होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीसाठीही त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार अशी चिन्हे होती. परंतु अचानक ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली गेली व ते खासदारही झालेत. त्यामुळे आता त्यांची रिक्त झालेली जागा कोण घेणार? असा प्रश्न शिवसेनेत चर्चिला जातो आहे. लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे आणि कल्याण या दोनही मतदारसंघात उत्तम कामगिरी बजावणारे शिवसेनेचे दोन मावळे नरेश म्हस्के व गोपाळ लांडगे या दोघांमध्ये या उमेदवारीसाठी चुरस असल्याचे बोलले जाते. तर कोळी समाजाला महत्त्व देण्याच्या दृष्टिकोनातून अनंत तरे यांचाही या मतदारसंघासाठी विचार होऊ शकतो असे ‘मातोश्रीं’च्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. तर एक विचारप्रवाह असा आहे की, तरे यांना विधान परिषदेवर पाठवावे व म्हस्के अथवा लांडगे यापैकी एकाला येथे उमेदवारी देऊन त्यांच्या निष्ठेचे व कार्याचे चिज करावे. तर दुसरा विचार प्रवाह असा आहे की, लांडगे आणि म्हस्के यांना महापालिकेच्याच राजकारणात सक्रिय ठेवून तरे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला विधानसभा गाजविण्याची संधी द्यावी. ती दिल्यास राज्यातील कोळी समाजाची मते शिवसेना आणि युतीच्या पाठीशी एकवटतील व त्याचा फायदा संपूर्ण राज्यात मिळेल. ठाणे महापालिकेच्या निवडणुकाही लवकरच होणार असल्याने ती ताब्यात ठेवण्याच्या दृष्टीने काही अनुभवी नेत्यांनी ठाण्यातच राहणे योग्य ठरणार आहे. महापालिकेचा गड राखण्यासाठी व सांभाळण्यासाठी म्हस्के व लांडगे यांना ठाण्यातच ठेवावे व त्यांना तिथे महत्त्वाची पदे द्यावीत व तरेंना आमदारकीची उमेदवारी द्यावी. या मतदारसंघावर अनिता बिर्जे, माजी महापौर अशोक वैती, विद्यमान महापौर हरिश्चंद्र पाटील यांनीही दावा ठोकला आहे. यापैकी वैती हे मतदारसंघा बाहेरचे असून त्यांचा आवाका ‘मातोश्री’ला कमी वाटतो आहे. तर हरिश्चंद्र पाटील शिवसेनेत इम्पोर्ट झालेले आहेत. बिर्जे यांनी नगरसेविकेपलीकडे झेप घेतलेली नाही. अशा स्थितीत तरे यांचा अनुभव आणि निष्ठा लक्षात घेता त्यांची दावेदारी प्रभावी असल्याची चर्चा शिवसेनेत आहे. (विशेष प्रतिनिधी)
ठाणे शहरमध्ये अनेक मावळे झाले बाशिंगवीर
By admin | Updated: May 26, 2014 02:24 IST