सुनील मनोहर महाधिवक्तापदी : २१ वर्षांनंतर पद नागपूरच्या वाट्याला नागपूर : वरिष्ठ वकील सुनील मनोहर यांची राज्याच्या महाधिवक्तापदी नियुक्ती झाल्यामुळे नागपूरच्या मुकुटात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. तब्बल २१ वर्षांनंतर हे पद नागपूरच्या वाट्याला आले आहे. ते नागपूरचे तिसरे महाधिवक्ता होय. यापूर्वी दिवंगत वरिष्ठ वकील अरविंद बोबडे यांची १९८० व १९८५, तर वरिष्ठ वकील व्ही. आर. मनोहर यांची १९९३ मध्ये महाधिवक्तापदी नियुक्ती करण्यात आली होती. बोबडे यांनी हे पद दोनवेळा भूषविले आहे. याशिवाय सुनील मनोहर यांच्यामुळे राज्याच्या इतिहासात एकाच कुटुंबातील दोघांना महाधिवक्ता होण्याचा मान प्रथमच मिळाला आहे.यावेळी सुनील मनोहर यांच्यासह नागपूरचेच वरिष्ठ वकील सुबोध धर्माधिकारी, छत्तीसगडचे महाधिवक्ता जुगलकिशोर गिल्डा, मुंबई येथील वरिष्ठ वकील राम आपटे व औरंगाबाद येथील वरिष्ठ वकील विनायक दीक्षित यांची नावे महाधिवक्तापदासाठी चर्चेत होती. मनोहर यांचे नाव मात्र आघाडीवर होते. आज, मंगळवारी त्यांच्या नावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. यानंतर विधी विभागाच्या सचिवांनी मनोहर यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून खुशखबरी जाहीर केली. यापूर्वी डेरिअस खंबाटा महाधिवक्ता होते.व्ही. आर. मनोहर यांचे मार्गदर्शनमाजी महाधिवक्ता अॅड. व्ही. आर. मनोहर यांचे सतत मार्गदर्शन मिळत असते. या बाबतीत मी सुदैवी आहे, असे सुनील मनोहर म्हणाले. महाधिवक्ता म्हणून कार्य करताना व्ही. आर. मनोहर यांच्यासह मिळेल तेथून मार्गदर्शन घेत राहील, असेही त्यांनी सांगितले.शिक्षण व वकिलीअॅड. सुनील मनोहर यांचे शालेय शिक्षण रामदासपेठेतील सोमलवार शाळेत झाले आहे. त्यांनी नागपूर विद्यापीठाच्या विधी महाविद्यालयातून एलएल. बी. पदवी पूर्ण केली आहे. त्यापूर्वी त्यांनी जी. एस. महाविद्यालयातून बी. कॉम. पदवी मिळविली होती. ते एलएल. बी. मध्ये मेरिट आले होते. त्यांना ४ पदके व ४ अन्य पुरस्कार मिळाले होते. यानंतर त्यांनी १९८७ पासून वडील अॅड. व्ही. आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली वकिली व्यवसायाला सुरुवात केली. अॅड. व्ही. आर. मनोहर हेच त्यांचे आदर्श आहेत. अॅड. व्ही. आर. मनोहर यांची महाधिवक्तापदी नियुक्ती होतपर्यंत सुनील मनोहर त्यांच्यासोबत होते. यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे वकिली सुरू केली. अॅड. व्ही. आर. मनोहर यांनी त्यांना सुरुवातीपासूनच प्रकरणे हाताळण्याची संधी दिली. त्यांनी उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठापुढे १९८९ मध्ये पहिल्यांदा युक्तिवाद केला होता.वरिष्ठ वकिलाचा दर्जा व गाजलेली प्रकरणे अॅड. सुनील मनोहर यांना २०११ मध्ये वरिष्ठ वकिलाचा दर्जा मिळाला. त्यांच्या वडिलांनाही हा दर्जा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील त्यांची अनेक प्रकरणे गाजली आहेत. त्यात डर्टी पिक्चर व अग्निपथ चित्रपटासंदर्भातील वाद, सार्वजनिक बांधकाम विभागातील ११९ कोटी रुपयांचा गैरव्यवहार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पात्र कुलगुरूंची नियुक्ती करणे इत्यादी प्रकरणांचा समावेश आहे.
नागपूरच्या मुकुटात मानाचा तुरा
By admin | Updated: November 19, 2014 00:53 IST