मुंबई : माळीण गावावर दरड कोसळली व त्यामध्ये अनेक माणसे जिवंत गाडली गेली. संपूर्ण गावच उद्ध्वस्त झाले आहे. अशा वेळी त्या ग्रामस्थांच्या मदतीला धावून जाणो हा मानवतेचा धर्म आहे. मुंबईचे डबेवालेही आसपासच्या परिसरातील राहणारे आहेत. त्यामुळे त्यांनाही या घटनेचे दु:ख आहे. तेही माळीणवासीयांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. त्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी मुंबईभर डबे पोहोचवणारे डबेवाले चिठ्ठी लिहून मदतीचे आवाहन करणार आहेत.
जास्तीत जास्त लोकांनी मुख्यमंत्री निधीलाही मदत करावी, असे आवाहन मुंबई जेवण डबे वाहतूक मंडळाने केले आहे. अंधेरी डबेवाला गोविंदा पथकाला या वर्षी दहीहंडी फोडून जी रक्कम जमा होईल त्यातील बहुतांशी रक्कम माळीण गावातील वाचलेल्या मुलांसाठी मदत दिली जाईल, अशी घोषणा मंडळातर्फे करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)