ऑनलाइन टीम
पुणे, दि. ३० - पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरजवळील माळीण गावात मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार संध्याकाळी उशीरापर्यंत १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले असले तरी तब्बल ३०० जण गाडले गेले असल्याची भीती आहे. पहाटे घडलेली घटना, १२ तासांपर्यंत मदत करण्यात आलेले अपयश आणि सततच्या पावसामुळे असलेला चिखलाचा त्रास विचारात घेता मृतांचा आकडा प्रचंड असू शकतो आणि कदाचित गाडले गेलेले सगळेजण दगावले असल्याची भीती स्थानिकांनी व प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे.
दरम्यान बचावपथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास नॅशनल डिझॅस्टर रेस्क्यू फोर्सचे ४० जवान मदतकार्यासाठी पोचले तर संध्याकाळी सातच्या सुमारास आणखी ३०० जवानांची कुमक पोचण्याच्या तयारीत होती.
बुधवारी पहाटे माळीण गावात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन डोंगरकडा खचला. गावकरी गाढ झोपेत असतानाचा डोंगराचा अख्खा भाग कोसळल्याने होत्याचे नव्हते झाले. गावामध्ये एकूण ६७ घरे असून त्यातील जवळपास ५० घरे ढिगा-याखाली गाडली गेली. या घरांमध्ये जवळपास ३०० ते ४०० जण ढिगा-याखाली गाडले गेले असावेत असा कयास आहे.
जेसीबी, पोकलेनने ढिगारे बाजूला काढण्याचे काम सुरु असून रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. माळीण आणि शेजारील काही गावांमध्ये अद्यापही भूस्खलन होण्याची भिती कायम असल्याचे पुण्याच्या जिल्हाधिका-यांनी म्हटले आहे. आजुबाजुच्या गावांमध्येही अशा प्रकारचा धोका असल्यास त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.
एका धरणातील बाधित कुटुंबाना या गावात पुनर्विस्थापीत करण्यात आले होते. या गावातील बहुसंख्य ग्रामस्थ हे आदिवासी शेतकरी होती. या घटनेबद्दल सर्व स्तरातून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.