मुंबई : पुणे येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील आठ आरोपींवर लावण्यात आलेला मक्कोका रद्द करण्याच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली़ जंगली महाराज मार्गावर १ आॅगस्ट २०१२ रोजी झालेल्या या बॉम्बस्फोटात एकजण जखमी झाला होता़ याप्रकरणी एटीएसने असद खान, इमरान खान, सय्यद फिरोज, इरफान लांडगे, मुनीब मेमन, फारूख बागवान, अरीफ व अस्लमला अटक केली़ या आरोपींवर मक्कोकासह बेकायदशीर कृत्य व आयपीसीच्या इतर कलमाअंतर्गत आरोप ठेवण्यात आले़ याचे आरोपपत्रही दाखल झाले़ मात्र मक्कोका व बेकायदेशीर कृत्य हे आरोप एकाचवेळी ठेवता येत नाही़ त्यामुळे मक्कोका रद्द करावा, अशी मागणी करणारा अर्ज या आरोपींनी विशेष न्यायाधीश ए़ एल़ पानसरे यांच्यासमोर केला़ तो ग्राह्ण धरत न्यायालयाने या आरोपींवरील मक्कोका रद्द केला़ याला एटीएसने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्या़ पी़ व्ही़ हरदास व न्या़ अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली़ न्यायालयाने ही याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेत विशेष न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली़ यावरील पुढील सुनावणी १६ सप्टेंबरला होणार आहे़ (प्रतिनिधी)
पुणे बॉम्बस्फोटातील आरोपींचा मक्कोका तूर्तास कायम
By admin | Updated: August 28, 2014 03:06 IST