शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राची लोकवाहिनी एस. टी. वाचणे कठीण!

By admin | Updated: December 24, 2016 23:44 IST

--- रविवार विशेष

महाराष्ट्राच्या जडणघडणीत एस. टी. महामंडळाने फार मोठी कामगिरी केली आहे. वाढती खासगी वाहने आणि महामंडळाकडे झालेले दुर्लक्ष यातून एस.टी.वाचणे कठीण होणार आहे. मात्र, ती वाचणे ही सामान्य माणसांची गरज आहे. महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून जिचा गौरव होतो, ती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची सेवा वाचणे कठीण होत जाऊ लागले आहे. दोन दिवसांपूर्वी एक बातमी होती की, एस. टी. महामंडळ १ जानेवारी ते ३१ मार्चअखेर ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ राबविणार आहे. अशी वेळ येण्यातच दुसरी बातमी दडलेली आहे की, एस. टी. महामंडळाची स्थिती काही चांगली नाही. देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच एस. टी. ची सेवा सुरू झाली. पुणे ते अहमदनगर दरम्यान मुंबई राज्य मंडळाची पहिली गाडी १९४८ मध्ये धावली. तत्कालीन मुंबई प्रांताचे गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारच्या मालकीची एस. टी. गाडीची सार्वजनिक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १९४८ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली. पुढे १९५० मध्ये रस्ते वाहतूक कायदा आला. त्यातील विभाग तीननुसार महामंडळाची रितसर स्थापना करण्यात आली. सुमारे बारा वर्षे या मंडळाचा कारभार चालला. महाराष्ट्र राज्याची १९६० मध्ये स्थापना झाली. तसे तिचे नामकरण ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ’ असे करण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या लोककल्याणकारी राज्य कारभाराचा भाग म्हणून राज्यातील जनतेला एस. टी. गाड्यांची वाहतूक एक सार्वजनिक सोय म्हणून सातत्याने विस्तार करण्याचे धोरण आखले गेले. ‘गाव तेथे एस. टी.’ असे घोषवाक्यही तयार करण्यात आले. अत्यंत दुर्गम भागापर्यंत गाव न गाव संपर्कात आणण्यात एस. टी. महामंडळाला बऱ्यापैकी यश आले. परिणामी माणसांना आपला विकास करण्याची एक संधी निर्माण करता आली. हजारो गावच्या मुला-मुलींनी शिक्षणासाठी एस. टी. गाड्यांचा वापर केला. आज या महामंडळाचा विस्तार वाढला आहे. सुमारे साडेसोळा हजार एस. टी. गाड्या १८ हजार ५०० मार्गांवरून धावतात. त्यातून दररोज सरासरी सत्तर लाख प्रवासी प्रवास करत आहेत. जिल्हा- जिल्ह्यातून धावणारी एस. टी. गाडी शेजारच्या अनेक राज्यांतही प्रवासी सेवा देत आहे. शिवाय माल वाहतुकीचेसुद्धा काम करते आहे. विविध कंपन्यांकडून गाड्या घेऊन त्यांची बांधणी दापोडी (जि. पुणे), औरंगाबाद आणि नागपूर येथे स्वत: महामंडळ करते आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोठी कामगिरी या एस. टी. महामंडळाने केली आहे. आजच्या पिढीला कदाचित त्याचे मोल वाटणार नाही; पण चाळीस वर्षांपूर्वी खेड्यापाड्यांत वाहतुकीचे एस.टी हे एकमेव साधन होते. तत्पूर्वी, काही खासगी कंपन्या होत्या. त्यांच्या मोटार गाड्यांतून छोट्या-मोठ्या शहरांना जोडणारी वाहतूक होत असे. एस. टी. महामंडळाने मात्र सर्व विक्रम मोडत एक अत्यावश्यक सेवा या स्वरूपात उत्तम भूमिका बजावली आहे. अनेक गावांना मुक्कामाची गाडी हे एक त्या गावच्या सामाजिक जीवनाचा भाग बनले होते. तीच गाडी सकाळी-सकाळी तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणास जायला निघायची. त्यामध्ये शासकीय कामासाठी, सरकारी नोकरीसाठी, शिक्षणासाठी, कोर्ट-कचेरीत हजेरी लावण्यासाठी, बाजारहाट करण्यासाठी माणसं भरभरून जात असत.महाराष्ट्राच्या विकासाचे जसे विविध टप्पे पाडता येतील, त्याप्रमाणे एस. टी.ची गरज ओळखून अनेक दुर्गम गावांतून तालुका किंवा जिल्हा नव्हे, तर मुंबईपर्यंत गाड्या सुरू करण्यात आल्या. पूर्वीच्या काळी केवळ मुंबई शहर हे मोठे रोजगाराचे केंद्र होते. खेड्यापाड्यांतील माणसं या महानगरीत रोजगाराच्या शोधात येत-जात असत. त्यामध्ये गिरणी कामगार आणि डॉकयार्डवर काम करणाऱ्या माथाडी कामगारांची संख्या मोठी होती. त्यामुळे चंदगड तालुक्यातील टोकाच्या सलामवाडी ते मुंबई किंवा साताऱ्यातील ढेबेवाडी खोऱ्यातून मुंबई, सांगलीच्या सोनसळहून मुंबई अशा एस. टी. गाड्या चाळीस वर्षे धावत आहेत. गावाकडे रोजगाराची संधी नव्हती. शेतीला बारमाही पाणी नव्हते. अशा परिस्थितीत लोकांना घेऊन जाण्याचे काम याच महाराष्ट्राच्या लोकवाहिनी एस. टी. ने केले आहे.आधुनिक जगात रस्त्याचा विकास झाला. अनेक रेल्वेमार्ग आखले गेले. कोकणासारख्या दुर्गम भागात एस. टी. हेच एकमेव वाहतुकीचे माध्यम होते. तेथेही पंचवीस वर्षांपूर्वी रेल्वेने प्रवेश केला. आज कोकणचा चाकरमानी रेल्वेने मुंबई आणि देशाच्या इतर भागांत ये-जा करीत आहे. दुसऱ्या बाजूने एकविसाव्या शतकाच्या आरंभापासूनच रस्ते विकासाबरोबरच वाहन उत्पादनात प्रचंड वाढ झाली. विशेषत: महाराष्ट्रात वाहन उत्पादनात प्रचंड वाढ झाली. आज देशातील एकूण वाहन उत्पादनांपैकी तेहेतीस टक्के वाहनांचे उत्पादन महाराष्ट्रात होते. लोकांची आर्थिक प्रगती आणि जीवन पद्धती बदलाबरोबर किमान दुचाकी वाहन प्रत्येकाच्या घरी येऊ लागले. महाराष्ट्रात हे प्रमाण देखील अधिक आहे. गेल्या पंधरा वर्षांतील वाहन विस्ताराचे प्रमाण पाहिले की, महाराष्ट्रातील रस्ते कमी पडत आहेत. शहरांतील रस्ते वाहनांच्या गर्दीने तुडुंब भरून वाहताहेत. महाराष्ट्रातील वाहनांच्या वाढीचे प्रमाण हे गेल्या दीड दशकात सात टक्के असेल, असे गृहीत धरण्यात आले होते. ती कमाल वाढ अपेक्षित होती. ती जवळपास तीन पट अधिक आहे. सध्या महाराष्ट्रातील वाहनांच्या वाढीचा वेग वीस टक्के आहे. तो देशातील सर्वाधिक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात खासगी वाहने रस्त्यावर येत असतील तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील एक प्रमुख घटक असलेल्या एस. टी. गाड्यांकडे कोण फिरकणार आहे? आज छोट्या-छोट्या शहरांपासून नव्याने मोठी होत असलेल्या शहरातील माणसं खासगी वाहनाशिवाय व्यवहार करूच शकत नाहीत, अशी एक अभद्र व्यवस्था तयार झाली आहे. यातून दोन प्रश्न गंभीर झाले आहेत. एक आहे वाहतुकीची कोंडी आणि दुसरी आहे की, त्या-त्या शहरांच्या प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे रस्ते वाढवायचे, भुयारी मार्ग तयार करायचे की, फ्लॉय ओव्हर (ब्रीज) बांधायचे याचा निर्णय घेईपर्यंत दमछाक होत आहे. आज मुंबईपाठोपाठ ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आदी शहरे वाहतूक व्यवस्थेच्या बोजवाऱ्याने बेचैन झाली आहेत. या सर्व शहरांतील सार्वजनिक वाहतुकीच्या व्यवस्थेचा बोजवारा वाजला आहे. मुंबई आणि पुण्यात कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो रेल्वेचे भूमिपूजन झाले. या शहरांचा विस्तार प्रचंड झाला आहे आणि त्यांच्या वाहतुकीच्या समस्या गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. अशावेळी काही मेट्रो मार्ग तयार करून या प्रश्नांवर उत्तर सापडणार नाही. कारण या सर्व गोेष्टी करण्यासाठी फार उशीर झाला आहे. महाराष्ट्र एस. टी. महामंडळाची गरज अशावेळी सर्वाधिक जाणवत राहते. शहरातील सार्वजनिक वाहतुकीत एस. टी.ची अवस्था केविलवाणी झाली आहे. मात्र, याचवेळी ग्रामीण भागात तिच्याशिवाय पर्याय नाही. खासगी वाहतुकीमुळे एस. टी.वर मोठा परिणाम झाला आहे. खासगी वाहतूक दोन प्रकारची आहे. एक सार्वत्रिक आहे. दुसरी व्यक्तिगत पातळीवर आहे. यामुळे एस. टी. वर खूप परिणाम झाला आहे. आजही महाराष्ट्रात एस. टी.ने दररोज ७० लाख प्रवासी वाहतूक करतात. मात्र, यात मोठी घट होत चालली आहे. राज्यभर एस. टी.ने २०११ मध्ये २६० कोटी प्रवासी प्रवास करीत होते. त्यात २०१६ मध्ये २४५ कोटींपर्यंत घट झाली आहे. म्हणजे गेल्या पाच वर्षांत पंधरा कोटी प्रवासी कमी झाले आहेत. ही घट सरासरी दरवर्षी तीन कोटी प्रवासी आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होत जाणार आहे. अशीच सध्याची परिस्थिती आहे. वाढती खासगी वाहने आणि एस. टी. महामंडळाकडे झालेले दुर्लक्ष यातून ती वाचणे कठीण होणार आहे. मात्र, ती वाचणे ही सामान्य माणसांची गरज आहे. गेल्या काही वर्षांत एस. टी. महामंडळाने नवे प्रयोग केलेले नाहीत किंवा त्यांना अशा प्रयोगांना कमी प्रतिसाद मिळाला आहे. याउलट कर्नाटकने असे अनेक प्रयोग केले. राज्यासाठी अवाढव्य एकच महामंडळ असणे कितपत योग्य आहे? याचाही विचार करावा लागणार आहे. कर्नाटकने १५ वर्षांपूर्वी कर्नाटक राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे चार भाग केले आहेत. शिवाय स्थानिक, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य एस. टी. वाहतूक अशी विभागणी केली आहे. एकसारखी एकक्षमतेचीच बस वाहतूक फायदेशीर नाही. शिवाय प्रवासी वाढविण्यासाठी चालक - वाहकास प्रोत्साहन भत्ता देण्याचे धोरण अवलंबिले आहे. आज महाराष्ट्रातील अनेक शहरांपर्यंत कर्नाटकातील एस. टी. गाड्या पोहचल्या आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावरून प्रवास करताना कर्नाटक राज्याची एस. टी. आपणास नजरेस पडते. महाराष्ट्रातील लोकही कर्नाटक एस. टी. ने प्रवास करणे पसंत करतात. ही सध्याची परिस्थिती आहे. महाराष्ट्र राज्याने एका वैभवशाली व्यवस्थेची दयनीय अवस्था करून ठेवली आहे. उशिरा आता शहाणपण सुचत आहे. प्रवाशांची वेगाने होणारी घसरण रोखण्याचे आव्हान आहे, अन्यथा गरिबांना न्याय देणारी एक व्यवस्था संपणार आहे. वसंत भोसले