लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सेवाग्राम आश्रम परिसरात असलेल्या महादेव भवनात २ आॅक्टोबर रोजी काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होत आहे. त्यासाठी महादेव भवन सज्ज करण्यात येत आहे. यापूर्वी १९४८ मध्ये महात्मा गांधींच्या हत्येनंतर काँग्रेस याच भवनात कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्यांदा होत आहे.या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी केंद्रीय महासचिव अशोक गहलोत व प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सेवाग्रामला भेट देऊन परिसरातील जागांची पाहणी केली होती. त्यामुळे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांचा सेवाग्राम दौरा निश्चित झाला होता. आश्रम परिसरात विविध कार्यक्रम असल्याने व राजकीय कार्यक्रमासाठी आश्रम प्रतिष्ठान जागा देत नसल्याने जागेविषयी अडचण होती. परंतु त्यानंतर झालेल्या चर्चेतून महादेव भवन बैठकीसाठी घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या दृष्टीने काँग्रेसने तयारी सुरू केली आहे.राहुल गांधी सकाळी ११ नंतर येथे पोहोचण्याची शक्यता आहे. यापूर्वी आश्रम परिसरात माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी वृक्षारोपण केले होते. या वृक्षाशेजारीच राहुल गांधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच ते सूत कताई केंद्राची पाहणीही करणार आहेत. त्यानंतर कार्यकारिणीची बैठक महादेव भवनात घेतली जाणार आहे. या बैठकीला सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह कार्यकारिणीचे किमान १०० ते १४० सदस्य उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बैठकीची व्यवस्था जमिनीवरच (गांधी पद्धतीची) केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्धेचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी गुरुवारी आश्रम परिसराची पाहणी केली. व आश्रम प्रतिष्ठानचे अधीक्षक भावेश चव्हाण यांच्याकडून माहिती जाणून घेतली. तसेच महादेवभाई भवन व हेलिपॅडचीही पाहणी केली. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा कामाला लागली असल्याचे दिसून येत आहे. सेवाग्राम परिसरात तीन हेलिपॅड तयार करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
इतिहासाचे साक्षीदार महादेव भवन१२ व १३ मार्च १९४८ ला महादेव भवनात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. या बैठकीला आचार्य विनोबा भावे, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आदी उपस्थित होते. त्यानंतर आता दुसºयांदा राहुल गांधी यांच्या नेतृत्वात बैठक घेतली जाणार आहे. महादेव भवन या इतिहासाचे साक्षीदार आहे.सेवाग्राम येथील महादेव भवनात कार्यकारिणीच्या सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे. ही सभा संपल्यानंतर वर्धा शहरातील यशवंत महाविद्यालयसमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला हारार्पण करून खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात वर्धा शहरातून पदयात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी ३ वाजता रामनगर परिसरातील सर्कस ग्राऊंडवर जाहीर सभा होईल. व येथे पदयात्रेचा समारोप होईल. अशी माहिती वर्धा शहर काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी लोकमतशी बोलताना दिली. या दृष्टीने शुक्रवारी सद्भावना भवनात शहर काँग्रेसची बैठक घेण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.संकटाच्या काळात काँग्रेसला सेवाग्रामने दिली ऊर्जा१९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. व १९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींचा दारूण पराभव झाला होता. त्यानंतर त्या सेवाग्राम व पवनार येथे आल्या व आचार्य विनोबा भावे यांची भेट घेतली.सेवाग्राम आश्रमातून ऊर्जा घेऊन गेल्यानंतर पुन्हा देशात काँग्रेसची सत्ता आली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीही सेवाग्राम आश्रमला भेट दिली. त्यामुळे गांधी परिवाराचे सेवाग्रामशी कायम ऋणानुबंध राहिलेले आहेत.