वसई : पतीच्या छळाला कंटाळलेली एक अशिक्षित महिला माहेरला जाण्यासाठी पुण्याहून घराबाहेर पडली. पदरात दमडी नाही. अशा परिस्थितीत वाईट लोकांच्या हाती पडण्यापेक्षा चालतच माहेरची वाट धरलेली संगीता चुकून नालासोपाऱ्यातील निर्मळ गावात पोहचली. चर्चच्या पायरीवर हताश पडून बसलेल्या संगीताची थेट माहेरशी भेट घडवून देण्याचे काम चर्चचे फादर ्नुसेर यांनी नगरसेवक आणि पोलिसांच्या मदतीने केले. बुलढाणा जिल्ह्यातील वरूड गावची संगीता जाधव (३०) लग्नानंतर पुण्यातील एमआडीसीत पती आणि ११ वर्षीय मुलासोबत रहायला आली होती. नवरा तिला गुरा-ढोरांसारखा मारायचा. रोजचा मार सहन न झाल्यामुळे संगीताने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. दहा दिवसांपूर्वी संगीता पुण्याहून गावी निघाली. पदरात पैसे नाहीत. अशिक्षित असल्याने कुठल्याही गावची माहिती नाही. बुलढाण्याचा रस्ता विचारला तर फसवणूक आणि अत्याचाराची भीती होती.त्यामुळे ती चालतच राहिली.१० दिवसांनी ती नालासोपाऱ्यातील निर्मळला पोहोचली. पोटात अन्न नसल्यामुळे आणि शरीर साथ देत नसल्यामुळे ती निर्मळ चर्चच्या आवारात रात्री झोपली.सकाळी फादररुपी देव तिच्या मदतीला धावून आला. फादरांनी स्थानिक नगरसेवक पंकज चोरघे आणि चर्चच्या सिस्टर शांती रुमाव यांना घेऊन भुईगाव पोलीस चौकीत संपर्क साधला.कॉन्स्टेबल गणेश भोसले यांनी बुलढाणा-ढोणगांव-वरुड अशा पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून संगीताच्या माहेरचा पत्ता शोधून काढला.त्यानंतर तिच्या माहेरी संपर्क साधून मुंबईतील चुलत भाऊ गणेश जाधवला संगीताची मोबाईलवरून माहिती दिली. सकाळी सुरु झालेले तपास आणि मदतकार्य सांकाळर्पंत अविरत सुरु होते. दरम्यान,निर्मळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सिस्टर सुजाता घोन्सालवीस यांच्याकडून तिची तपासणी करण्यात आली. अशक्त झालेल्या अंगात ताप असल्यामुळे तिला पोटभर जेवायला देण्यात आले आणि औषधोपचारासह नवीन कपडेही देण्यात आले. सायंकाळी भाऊ गणेशशी तिची भेट झाली. त्यावेळी १० दिवस कोमेजलेल्या,मळकटलेल्या आणि विस्कटलेल्या संगीताच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहु लागला.माहेरच्या माणसाशी आपली गाठ पडल्यामुळे ती आस्वस्त झाली. ताटातुट झालेल्या आपल्या पोटच्या मुलाचीही आता भेट होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे तिला तरतरी आली. फादरांसह पंकज चोरघे,सिस्टर रुमाव आणि कॉन्स्टेबल भोसले यांचे आसवांनी आभार मानून ती माहेराच वाटेला निघून गेली.संगीताला केलेली मदत आणि तिने व्यक्त केलेली कृतज्ञता यामुळे सगळ््यांनाच समाधान लाभले.
हरविलेल्या महिलेला घडवली माहेरची भेट
By admin | Updated: September 22, 2016 03:23 IST