पुणे : रुपी बँकेच्या आर्थिक अडचणीला जबाबदार असणारे संचालक आणि कर्ज बुडविणाऱ्या १०१ जणांच्या नावांचे महात्मा फुले मंडई येथे फ्लेक्स लावून पुणेकर नागरिक कृती समितीच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले.महात्मा फुले मंडई येथे सोमवारी सकाळी राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त डॉ. अभिजित वैद्य यांनी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाला सुरुवात केली. या वेळी पुणेकर नागरिक कृती समितीचे मिहिर थत्ते यांच्यासह रुपी बँकेचे खातेदार-ठेवीदार उपस्थित होते. मिहिर थत्ते यांनी म्हणाले, की रुपी बँकेचे राज्यातील सुमारे सात लाख खातेदार तीन वर्षांपासून मरणयातना सोसत आहेत. खातेदारांच्या या अवस्थेला तत्कालीन संचालक आणि कर्ज बुडविणारे कर्जदार हे जबाबदार आहेत. १९९९पूर्वी दिलेल्या कर्जाची वर्षानुवर्षे वसुली न करता स्वत:चे खिसे भरण्याचेच कर्तृत्व या सगळ्यांनी दाखवून कर्जबुडव्यांना संरक्षण देण्याचेच काम संचालकांनी केले आहे. अशा संचालकांचे छायाचित्र असलेले त्याचबरोबर १९९७पासूनच्या टॉप १०१ कर्जबुडव्यांच्या नावांचे त्यांच्या कर्जांच्या रकमेसह फ्लेक्स लावण्यात आले. पुढील दोन दिवसांत शहरातील मुख्य चौकांमध्ये आणखी फ्लेक्स लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कर्जबुडवे झळकले फ्लेक्सवर
By admin | Updated: August 2, 2016 01:12 IST