अहमदनगर : गेल्या अडीच महिन्यांपासून ऊस तोडणी, वाहतूक व मुकादम कामगार संघटनेने संप पुकारलेल्या संपावर शासनस्तरावरून अद्यापही तोडगा न निघाल्याने कामगारांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे़ ‘संघटनेचे ऐकावे की पोटाचे पहावे’ अशी त्यांची सध्या अवस्था झाली आहे़ राज्यातील साडेबारा लाख ऊस तोडणी कामगारांची रोजीरोटी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर अवलंबून आहे़ तर साखर कारखान्यांचा गळीत हंगामही कामगारांच्या कष्टातूनच पूर्णत्वास जातो़ शासन मात्र, कामगारांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याने संप लांबला आहे़ शासनासोबतचा दरवाढीचा करार संपुष्टात आला असून, आता नव्याने लवाद नेमून दरवाढ करावी यासह संघटनेने १५ मागण्या शासनासमोर मांडल्या आहेत़ दोन महिन्यापूर्वी तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घेवून आठ दिवसांत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते़ मात्र, यातील एकही मागणी पूर्ण झालेली नाही. विधानसभा निवडणुकीची आचारसंहितेत हा प्रश्न मार्गी लागला नाही. साखर कारखान्याचा चार ते साडेचार महिन्यांचा गळीत हंगाम पूर्ण करून गावाकडे शेती करण्यासाठी कामगार परतत असतात़ कारखाने उशिरा सुरू झाले तर गळीत हंगामही एक महिना लांबू शकतो़ शासनाने ठरविले तर सर्व मागण्या पूर्ण होऊ शकतील़ राज्यातील सर्व मुकादम संपावर ठाम आहेत़ मागण्या मान्य झाल्याशिवाय एकही कारखाना सुरू होवू देणार नाही़ पाथर्डी तालुक्यातील कामगारही बाहेर जाऊ देणार नाही, असे कामगार संघटनेचे पदाधिकारी बाबासाहेब धायतडक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पोटाचे पाहावे की संघटनेचे ऐकावे...!
By admin | Updated: October 22, 2014 05:54 IST