रत्नागिरी : केरळमधील त्रिवेंद्रमजवळ रविवारी पहाटे मंगळुरू एक्स्प्रेस रूळावरून घसरल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. त्यामुळे सोमवारी दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वे मार्गावरून एक्स्प्रेस गाड्या तब्बल १५ ते १६ तास उशिराने धावत आहेत. बिघडलेल्या वेळापत्रकामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत. सर्व एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत होण्यासाठी आणखी चार दिवस तरी लागण्याची शक्यता आहे.कोकण रेल्वेमार्गावरून त्रिवेंद्रमला जाणाऱ्या मंगळुरू एक्स्प्रेसचे सहा डबे रविवारी पहाटे रुळावरून घसरून अपघात झाला होता. या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले होते. मार्ग सुरळीत करण्याचे काम तत्काळ हाती घेण्यात आले. या अपघातानंतर रविवारी केरळमधून मुंबईकडे जाणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली, तर काही गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या होत्या. सोमवारीही लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णत: कोलमडले होते. त्यामुळे रेल्वेने या गाड्यांचे वेळापत्रक आठ तासांसाठी पुढे ढकलले आहे.सोमवारी केरळहून रत्नागिरीत सकाळी ७ वाजता येणारी गरीबरथ एक्स्प्रेस १५ तास उशिराने धावत आहे. रत्नागिरीत सकाळी ९ वाजता येणारी पोरबंदर एक्स्प्रेस १६ तास उशिराने धावत आहे. सकाळी ६.१० वाजता येणारी मंगला एक्स्प्रेस १८ तास उशिराने येत आहे. सकाळी ११ वाजता येणारी नेत्रावती एक्स्प्रेस १६ तास उशिराने धावत आहे. दुपारी ३.१० वाजता येणारी एर्नाकुलम-अजमेर मरूसागर एक्स्प्रेस १२ तास उशिराने धावत आहे. या गाड्यांचे वेळापत्रक नियमित होण्यास अजून चार दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)मुंबई-मडगाव सेवा मात्र सुरळीतलांब पल्ल्याच्या गाड्या कोकण रेल्वे मार्गावरून जरी उशिराने धावत असल्या तरी मडगाव ते मुंबई दरम्यान धावणाऱ्या सर्व गाड्या वेळेवर धावत आहेत. या गाड्यांच्या वेळापत्रकात किरकोळ बदल झाला आहे. मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, सावंतवाडी-दिवा पॅसेंजर, राज्यराणी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, रत्नागिरी-दादर पॅसेंजर या गाड्या थोड्या उशिराने धावत आहेत.गणेशोत्सवात विघ्न नकोगणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असल्याने तोवर लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत न झाल्यास मुंबई-मडगाव दरम्यान धावणाऱ्या गाड्यांवर गणेशभक्तांचा अधिक भार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात वाहतुकीत गोंधळ निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.
लांब पल्ल्याच्या रेल्वे १६ तास उशिराने
By admin | Updated: August 29, 2016 23:15 IST