मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे मध्य रेल्वेला फटका बसत असतानाच मंगळवारीही पुरता गोंधळ पाहण्यास मिळाला. दादर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे आणि त्यानंतर दोन वेगवेगळ्या ठिकाणी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दिवसभरात ५५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलही विविध कारणांनी दिवसभर उशिराने धावत होत्या. सकाळी सव्वा सातच्या सुमारास दादर स्थानकात सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या मार्गावर ओव्हरहेड वायर तुटली. ओव्हरहेड वायर तुटल्याने धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात आल्या आणि त्यामुळे लोकलची वाहतूक रखडली आणि दोन्ही सेवा तब्बल अर्धा तास उशिराने धावू लागल्या. ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करण्यास रेल्वेला तब्बल सव्वा दोन तास लागले आणि लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र त्यानंतरही लोकल उशिरानेच धावत असल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले. त्यानंतर सीएसटी जवळही दुपारी पावणे एकच्या सुमारास अप जलद मार्गावर एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने चिंचपोकळी ते सीएसटीपर्यंत लोकलच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे अनेक प्रवाशांनी ट्रॅकवरून चालत जवळचे स्थानक गाठणे पसंत केले. लोकलमधील बिघाड दुरुस्त करण्यास जवळपास अर्धा तास लागला. सकाळपासून प्रवाशांनी मनस्ताप सहन केलेला असतानाच संध्याकाळी पुन्हा एकदा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. संध्याकाळी ५.२0च्या सुमारास ठाणे येथे लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यास २० मिनिटे लागल्याने सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या रांगा लागल्या होत्या.
शहरभर लोकलकल्लोळ
By admin | Updated: June 24, 2015 02:26 IST