मुंबई : कसारा येथून सीएसटीच्या दिशेने येणाऱ्या जलद लोकलमधून येणाऱ्या जोरदार आवाजामुळे तसेच लोकलमधून अचानक धूर येऊ लागल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यात मुलुंड स्थानकादरम्यान अर्ध्या तासाहून अधिक वेळ लोकल थांबल्याने आणखीनच भर पडली. प्रवाशांनी संपूर्ण लोकलच रिकामी केल्याची घटना आज मुलुंडमध्ये घडली.दुपारी १.३५च्या सुमारास कसारा येथून सुटलेल्या सीएसटी जलद लोकलने ठाणे स्थानक सोडताच पेंटाग्राफच्या डब्याच्या बाजूला काहीतरी फुटल्याचा आवाज झाला. ही लोकल मुलुंड स्थानकात पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा मोठा आवाज झाला व पेंटाग्राफमधून धूर निघू लागला. त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. मुलुंड स्थानकावरील ४ नंबर प्लॅटफॉर्मवर ही लोकल थांबविण्यात आली. त्यानंतर भीतीने प्रवाशांनी ही लोकल पूर्ण रिकामी केली. विशेष म्हणजे हा गोंधळ सुरू असताना उद्घोषणा कक्षातून कोणतीही सूचना देण्यात येत नव्हती. त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. अनेक प्रवाशांची भीतीने पळापळ सुरू केल्याचे चित्र मुलुंड स्थानकावर निर्माण झाले होते. कल्याणपासून या लोकलमध्ये तांत्रिक बिघाड जाणवू लागल्याने काम सुरू होते. त्यात मुलुंड स्थानकादरम्यान हा बिघाड वाढला. त्यानंतर लोकल मुलुंड स्थानकात थांबविली. अर्धा तास या लोकलमध्ये काम केल्यानंतर १.५५च्या सुमारास लोकल पुन्हा सीएसटीच्या दिशेने रवाना केली. (प्रतिनिधी)
लोकलमधील आवाजाने पळापळ
By admin | Updated: December 29, 2014 05:52 IST