- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
मुंबईची जीवनरेखा असलेली लोकल ट्रेन वाहतूक गेल्या तीन वर्षांपासून ३ हजार ३९४ कोटी रुपये तोट्यात आहे याचे मुख्य कारण लोकल ट्रेन वाहतुकीसाठी रेल्वेला सोसावा लागणारा खर्च आणि मुंबईकरांना दिली जाणारी स्वस्त दरातली मासिक पास सुविधा यामुळे वर्षभर पूर्ण क्षमतेने ही वाहतूक सुरू असली तरी मिळणारे प्रत्यक्ष उत्पन्न आणि खर्च यात मोठी तफावत आहे असे उत्तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी राज्यसभेत दिले.शिवसेना नेते संजय राऊ त यांच्या मूळ प्रश्नाला उत्तर देतांना प्रभू म्हणाले, मुंबईकर लोकल प्रवाशांची भाडेआकारणी अत्याधिक सबसिडीची आहे. मुंबईकरांना मासिक, त्रैमासिक, अर्धवार्षिक व वार्षिक रेल्वे पासची सुविधा उपलब्ध आहे जी अतिशय स्वस्त आहे. रेल्वेच्या द्वितीय श्रेणी प्रवासाला आकारण्यात येणाऱ्या तिकिटापेक्षाही ती कमी आहे. रेल्वेला या सेवेतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने ही सेवा गेल्या ३ वर्षांपासून तोट्यात आहे.- मुंबई उपनगरी लोकल वाहतुकीची प्रवासी भाडेवाढ न करता ही वाहतूक अधिक लाभदायक करण्यासाठी सरकारने विविध प्रकारची पाउले उचलली आहेत, असे स्पष्ट करतांना प्रभू म्हणाले, इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट (इएमयु)ला बोगीच्या बाहेरच्या भागावर पूर्ण जाहिराती मिळवण्याचे अधिकार. - प्रवासी बोगीत एलईडी डिस्प्ले तसेच वाणिज्यिक जाहिरातींच्या उद्घोषणाव्दारे उत्पन्न मिळवणे, पेपरलेस मोबाईल तिकिटाचे अॅप सुरू करणे, तिकिटांसाठी स्वयंचलित वेडिंग मशिन्स, अनारक्षित तिकिटांसाठी प्रवासी सुविधा केंद्र तसेच सर्वसाधारण तिकीट बुकिंग सेवा, स्मार्ट कार्ड तिकिट विक्री सुरू करणे, विनातिकिट प्रवाशांकडून सातत्याने दंडाची वसुली करण्यासाठी बॅरियर चेकिंग, रेल्वेचा रनिंग स्टाफ, वाणिज्यिक स्टाफ व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या ओव्हरटाईम कामाची सातत्याने समीक्षा, अशा काही ठळक योजना रेल्वेने राबवल्या आहेत.- मुंबईच्या उपनगरी रेल्वे वाहतुकीत आमुलाग्र बदल घडवण्यासाठी पर्यायी इलेव्हेटेड मार्ग उभारण्याच्या योजनेला लवकरच गती देण्यात येणार असून सर्वसाधारण व विशेष अशा दोन प्रवर्गात याची विभागणी करण्यात येणार आहे.- या लोहमार्गावरून होणाऱ्या नव्या लोकल ट्रेनच्या प्रवासी वाहतुकीचे दर थोडे अधिक असतील मात्र लोकल ट्रेन वाहतुकीवर सध्या पडणारा भार त्यामुळे काही प्रमाणात कमी होउ शकेल. विशेषत: पावसाळयात मुंबईकरांची गैरसोय होणार नाही.- याखेरीज मुंबईत एमयुटीपी ३ योजना पूर्णत: वेगाने कार्यान्वित करण्याचा सरकारचा इरादा आहे, असे उत्तर प्रभूंनी अजय संचेती यांच्या उपप्रश्नाला दिले.