यदु जोशी, मुंबईमुख्यमंत्रीपदाचा निर्णय होत नसला तरी अनेक भारतीय जनता पार्टीमधील इच्छुकांनी मंत्री पदासाठी जबरदस्त लॉबिंग सुरू केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांना भेटून, ‘आमचा विचार करा’,अशी गळ त्यांना घातली जात आहे. काही आमदार जातीय समीकरणांमध्ये त्यांना मंत्रिपद मिळणे कसे आवश्यक आहे, हे पटवून सांगतात. काही जणांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आशीर्वाद घेण्याचे प्रयत्न चालविले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, नितीन गडकरी आणि नवे मुख्यमंत्री यांच्यात सल्लामसलत होऊनच मंत्रिमंडळ निश्चित केले जाईल. या शिवाय, राज्यातील नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, गिरीश बापट या नेत्यांशी त्यांच्या विभागातून कोणाला मंत्री करायचे या बाबत चर्चा केली जाईल, अशी शक्यता आहे. मोदी यांनी केंद्रात सरकार स्थापन करताना ७५ वर्षे वयावरील नेत्यांना मंत्री करायचे नाही असा निर्णय घेतल्याने दिग्गज गळाले होते. राज्यातही हा निकष लावला जाण्याचीही शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा चेहरा तरुण राखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
मंत्रिपदासाठी भाजपात सुरू झाले लॉबिंग
By admin | Updated: October 22, 2014 06:05 IST