भरत बुटाले, कोल्हापूरलोकराजा राजर्षी शाहू छत्रपती यांच्या जीवनावरील ग्रंथ जर्मन भाषेत अनुवादित करण्यात आला असून, त्याचे १२ नोव्हेंबर रोजी प्रकाशन होणार आहे. आतापर्यंत या ग्रंथाचा आठ भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. इंग्रजीनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर शाहू महाराजांवरील अनुवादित होणारा हा पहिलाच ग्रंथ आहे, अशी माहिती ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंंगराव पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.स्वीत्झर्लंडमध्ये स्थायिक, पण मूळचे भारतीय असलेले (हिरलगे, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) सुधीर पेडणेकर यांनी या चरित्रग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला आहे. आमच्यात झालेल्या चर्चेनंतर हा ग्रंथ तयार करण्याचे ठरविले. ‘राजर्षी शाहू छत्रपती’ या मथळ्याखाली या ग्रंथाच्या अनुवादापासून ते तयार करण्यापर्यंतची सर्व जबाबदारी पेडणेकर यांनी उचलली. जर्मन भाषेत ग्रंथ तयार करून ती पूर्णही केली. शिवाजी विद्यापीठातर्फे होणाऱ्या सोहळ्यात फेडरल रिपब्लिक आॅफ जर्मनचे कौन्सुल जनरल सिबर्ट यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणार असल्याचे डॉ़ पवार यांनी सांगितले.वडील काशीनाथ पेडणेकर यांची शैक्षणिक जडणघडण शाहू महाराजांमुळेच झाली. ते शिकले म्हणून आम्ही शिकलो आणि आमची येथपर्यंत वाटचाल झाली. आमच्याबरोबरच असंख्य लोकांना प्रेरणा व दिशाही मिळाली. ब्रिटिशांच्या सार्वभौमत्वाखाली असतानाही त्यांनी केलेले समाजसुधारणेचे महान कार्य ग्रंथरूपात आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचावे म्हणून हा ग्रंथ अनुवादित केल्याचे सांगून पेडणेकर म्हणाले की, माझे महाविद्यालयीन शिक्षण जर्मन भाषेत झाले असून, तेथे नोकरी आणि व्यवसायामुळे ती माझी मातृभाषाच झाली आहे. त्यामुळेच हा ग्रंथ जर्मन भाषेत अनुवादित करण्याचे निश्चित केले.
राजर्षी शाहूंचे जीवनचरित्र आता येणार जर्मन भाषेत
By admin | Updated: November 10, 2014 11:45 IST