ऑनलाइन लोकमतअकोट, दि. 22 - म्हैस बांधण्याच्या कारणावरून वाद करून वडील व भावाची हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी २२ डिसेंबर रोजी हिवरखेड येथील आरोपी अय्याज खाँ आझाद खाँ (३६) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील अय्याज खाँ आझाद खाँ (३६) रा. विकास मैदान याने त्याचे वडील आझाद खाँ तमीज खाँ (६०) व भाऊ फैयाज खाँ आझाद खाँ यांच्याशी म्हैस बांधण्याच्या कारणावरून व घरगुती वादावरून आपसात पटत नव्हते. त्याच कारणावरून आरोपी अय्याज खाँ आझाद खाँ (३६) रा. विकास मैदान याने हिवरखेड येथील आठवडी बाजारात ७ एप्रिल २०१४ रोजी वडील आझाद खाँ तमीज खाँ (६०) व भाऊ फैयाज खाँ आझाद खाँ या दोघांना सुऱ्याने भोसकले. उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी एजाज खाँ आझाद खाँ यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध भादंवि ३०७, ३०२, ३२४ अन्वये हिवरखेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी तपासाअंती पोलिसांनी अकोट येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे १० साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी तीन साक्षीदार फितूर झाले. या प्रकरणाचे तपास अधिकारी तत्कालीन ठाणेदार अनंत पूर्णपात्रे हे मरण पावल्यामुळे त्यांची साक्ष न्यायालयात घेता येऊ शकली नाही. त्याऐवजी त्यांचे रायटर एनपीसी डिगांबर अरखराव यांची साक्ष न्यायालयाने नोंदविली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने या घटनेत तपासलेले प्रत्यक्ष साक्षीदार व इतर परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे २२ डिसेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल देताना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी आरोपी अय्याज खाँ आझाद खाँ याला कलम ३०२ मध्ये आजन्म कारावास व ५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे अॅड. राजेश्वर एस. रेलकर, तर आरोपीच्यावतीने अॅड. उगले यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी दीपक गवई यांनी काम पाहिले.
वडील आणि भावाची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
By admin | Updated: December 22, 2016 19:55 IST