मुंबई : गेल्याच आठवडय़ात 36 तासांत मुंबई, ठाण्यात मिळून 3 ब्रेनडेड रुग्णांमुळे 8 जणांना जीवनदान मिळाले होते. ही घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील एका ब्रेनडेड रुग्णाचे यकृत, किडनी आणि डोळे दान केल्यामुळे पाच जणांना जीवनदान मिळाले आहे.
19 जुलै रोजी सुरेखा कोळी (5क्) यांना चक्कर येऊन उलटय़ा होऊ लागल्यामुळे कोपरखैरणो येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. मात्र त्यांची प्रकृती आणखीनच बिघडल्यामुळे सुरेखा यांना नेरूळच्या एका रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. येथे त्यांचा एमआरआय काढला, तेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये रक्तस्नव झाल्याचे दिसून आले. दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. 21 जुलै रोजी सुरेखा यांच्या तपासण्या केल्यावर त्या ब्रेनडेड झाल्या. यानंतर नेरूळच्या तेरणा सह्याद्री रुग्णालयातील डॉक्टरांनी सुरेखा या ब्रेनडेड झाल्याचे त्यांच्या मुलाला आणि सुनेला सांगितले. मात्र त्यांच्या इतर अवयवांचे कार्य सुरू असल्यामुळे त्यांचे अवयवदान केल्यास गरजू रुग्णांना जीवनदान मिळेल, असे सांगितले. त्यांचा मुलगा अवयवदान करण्यासाठी तयार झाला. मात्र तेरणा रुग्णालयाची विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीमध्ये (ङोडटीसीसी) नोंदणी नसल्यामुळे त्यांनी रुग्णाला नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला.
सुरेखा यांची एक किडनी नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयातील एका रुग्णाला दिली; तर दुस:या किडनीचे प्रत्यारोपण ङोडटीसीसीच्या प्रतीक्षा यादीत असलेल्या ब्रीच कॅण्डीमधील रुग्णाला दिली. ग्लोबल रुग्णालयातील रुग्णाला यकृत दिले, तर दोन्ही डोळे हे श्रॉफ आय बँकेला देण्यात आल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाचे प्रशासक पी. के. शशांकर यांनी दिली. (प्रतिनिधी)
सुरेखा यांच्या मुलाने दोन डोळे, दोन किडन्या आणि यकृत दान करण्यास संमती दिली होती. 21 जुलै रोजी रात्री साडेदहाला सुरेखा यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. यानंतर सुरेखा यांचे अवयव काढून 22 जुलै रोजी त्यांच्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्यात आले.