पौर्णिमेच्या रात्री एक तास दिवे बंद : नागरिकांचा प्रतिसादनागपूर : मंगळवारची पौर्णिमेची रात्र. महापौरांसह महापालिकेचे पदाधिकारी रात्री ८ वाजता व्हेरायटी चौकात जमले. या परिसरातील पथदिवे तासभर बंद करून ऊर्जाबचतीचा संकल्प केला. रस्त्याने जाणारे नागरिकही या उपक्रमात सहभागी झाले. सभोवतालच्या व्यावसायिकांनीही दुकानातील दिवे बंद करून या उपक्रमाला प्रतिसाद दिला. महापालिकेतर्फे प्रत्येक पौर्णिमेला राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकदिनाच्या भाषणात प्रशंसा केली होती. त्यामुळे नागपूरकरांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. मंगळवारी रात्री ८ वाजता महापौर प्रवीण दटके, आमदार अनिल सोले, उपमहापौर मुन्ना पोकुलवार, महापालिका आयुक्त श्याम वर्धने, सहायक आयुक्त सुभाष जयदेव, कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल, नगरसेविका लता घाटे, उपअभियंता अजय मानकर, सलीम इकबाल, श्रीकांत भुजाडे, अनिल कडू आणि कर्मचाऱ्यांनी व्हेरायटी चौक गाठून तेथील व्यापारी आणि आजूबाजूच्या नागरिकांना एक तास विजेचे दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रतिष्ठानातील तसेच घरातील दिवे बंद केले. ऊर्जाबचतीत सर्वांचा सहभाग महत्त्वाचा असून, नागपूरात सुरू झालेला प्रयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लागू केला, ही नागपूरसाठी मोठी उपलब्धी असल्याचे महापौर दटके म्हणाले. यावेळी ग्रीन व्हिजिल संघटनेचे डॉ. कविता रतन, कौस्तुभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, विश्वजित पाईकराव, संदेश साखरे, राहुल राठोड, नीलेश मुनघाटे, कुमारेश टिकादर, शुभम येरखेडे, शीतल चौधरी, राहुल राठोड, पायल राठोड, अनामिका घोष, विष्णुदेव यादव यांनीही या उपक्रमासाठी घरोघरी जाऊन जनजागृती करण्यासाठी पाऊल उचलले आहे. ग्रीन व्हिजिलच्या तरुणांनी परिसरात फिरून नागरिकांना दिवे बंद करण्याचे आवाहन केले. रात्री ९ वाजेपर्यंत व्हेरायटी चौक आणि परिसरातील दिवे बंद ठेवण्यात आले होते. (प्र्रतिनिधी)माहितीपत्रकांचे वितरण वीजनिमिर्तीसाठी ५०० ग्रॅम कोळसा, ७.५ लिटर पाणी खर्च होऊन तापमानात वाढ करणाऱ्या १ हजार ग्रॅम कार्बनडाय आॅक्साईडचे उत्सर्जन होते. त्यामुळे पौर्णिमेच्या रात्री एक तास विजेचे दिवे, उपकरणे बंद ठेवून पर्यावरणास हातभार लावण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले. वीज वाचवा, पृथ्वी वाचवा तसेच पौर्णिमा दिवस साजरा करा, असा संदेश देणाऱ्या माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले.
चला वीज बचत करू या!
By admin | Updated: September 10, 2014 00:50 IST