नम्रता फडणीस, पुणेसाहित्य संमेलनाला रिकामटेकड्यांचा उद्योग संबोधणारे ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी घुमान संमेलनाला उपस्थित राहू शकत नसल्याचे स्पष्ट केले आहे. नेमाडेंनी नाशिकमध्ये कार्यक्रम असल्याची सबब देत संमेलनाला येण्यास नकार दर्शविला आहे. त्यामुळे आयोजकांच्या आशेवर विरजण पडले आहे.साहित्य विश्वातील सर्वोच्च ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संमेलनाविषयी वादग्रस्त विधाने करुनही नेमाडेंनी घुमानला यावे, यासाठी आयोजकांनी त्यांना पायघड्या घातल्या. त्यांची काहीशी मनधरणीही केली होती. मात्र त्यात त्यांना यश आलेले नाही.साहित्य संमेलन म्हणजे नस्ती उठाठेव असून, संमेलनावर चर्चा करणे हा वेळेचा अपव्यय आहे. संमेलनात निव्वळ चर्चा होते, मात्र त्याबाबत पुढे काहीच घडत नाही. शहाणपणाला मर्यादा असते, पण मूर्खपणाची काही हद्द नसते, असे सांगत संमेलनासाठी राजकारण्यांकडून पैसा घेण्यात येतो; उद्या शत्रूकडूनही पैसे आणतील अशी बोचरी टीका नेमाडे यांनी केली होती. त्यातच घुमानला पंजाबचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक सहभागी होत असल्यामुळे संयोजन समितीला नेमाडे यांनाही आमंत्रण देणे भाग पडले. नेमाडे घुमानवारी करणार का, याकडे समस्त साहित्यवर्तुळाचे लक्ष लागले होते. ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला असता संमेलनाला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. समितीकडून मला रीतसर पत्र मिळाले आहे. मात्र संमेलनाच्या कालावधीतच नाशिकला २ ते ५ एप्रिल दरम्यान आधीच निश्चित झालेला कार्यक्रम आहे. त्यामुळे संमेलनाला येणे शक्य नसल्याचे समितीला कळविले आहे.
साहित्य संमेलनाकडे भालचंद्र नेमाडेंची पाठ
By admin | Updated: March 14, 2015 05:09 IST