मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या सात जागांचा निकाल उद्या, बुधवारी जाहीर होणार आहे. सकाळी ११पर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. नागपूरची जागा भाजपाने बिनविरोध जिंकली आहे. मुंबईतील दोन जागांसाठी पर्यावरण मंत्री शिवसेनेचे रामदास कदम, काँग्रेसचे भाई जगताप आणि अपक्ष प्रसाद लाड यांच्यात चुरस आहे. कदम यांचा विजय निश्चित मानला जातो. मात्र, जगताप आणि लाड यांच्यापैकी कोण याबाबत उत्सुकता आहे. कोल्हापुरात काँग्रसचे सतेज पाटीलविरुद्ध विद्यमान आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सोलापुरात राष्ट्रवादीचे दीपक साळुंखेविरुद्ध भाजपा पुरस्कृत अपक्ष प्रशांत परिचारक असा सामना आहे. धुळे-नंदुरबारमध्ये अमरिश पटेल यांची सरशी होईल, असे मानले जाते. त्यांच्याविरुद्ध भाजपाचे डॉ. शशिकांत वाणी नशीब अजमावित आहेत. अहमदनगरमध्ये विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे अरुण जगताप आणि शिवसेनेचे प्रा. शशिकांत गाडे यांच्यात जगताप यांचे पारडे जड मानले जाते. अकोला-बुलडाणा-वाशिममध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरियाविरुद्ध राष्ट्रवादीचे रवी सपकाळ अशी लढत होत आहे. बहुतेक मतदारसंघांमध्ये मतदारांना अर्थपूर्ण आमिषे दाखविण्यात आल्याची चर्चा आहे. विशेषत: कोल्हापुरात सोन्याच्या तलवारीची लढाई होती. गेली सहा वर्षे नागपूर, मुंबई आणि कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार या चार जागा काँग्रेसकडे, मुंबई, अकोला शिवसेनेकडे, सोलापूर, अहमदनगर या दोन जागा राष्ट्रवादीकडे असे पक्षीय बलाबल होते. (विशेष प्रतिनिधी)
विधान परिषद; आज फैसला
By admin | Updated: December 30, 2015 01:20 IST