पुणे : जिल्हा परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सलग ४६ ते ४८ तास काम करावे लागते. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्या नियमित कामावर रुजू व्हावे लागते, परिणामी कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येतो, त्यामुळे निवडणुकीचे काम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संबंधित कर्मचाऱ्यांना रजा द्यावी, अशी मागणी शिक्षक हितकारणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.राज्यात सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पालिका निवडणुकांसाठी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयातील हजारो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी कामावर आहेत. येत्या २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाच्या आदल्या दिवसापासूनच सर्वांना संबंधित केंद्रावर कार्यरत व्हावे लागणार आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच सर्व निवडणूक यशस्वीपणे पार पडणार आहे. निवडणुकीच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत निवडणुकीचे काम चालणार आहे. परिणामी सलग ४६ ते ४८ तास काम केल्याने या कर्मचाऱ्यांवर मानसिक ताण पडणार आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने रजा द्यावी, या मागणीचे निवेदन शिक्षक हितकारणी संघटनेतर्फे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण सचिव, राज्याचे मुख्य सचिव यांना देण्यात आले आहे.(प्रतिनिधी)
निवडणुकीनंतर शिक्षकांना रजा द्यावी
By admin | Updated: February 16, 2017 03:34 IST